सुनीताने एक महत्त्वाचा संदेश दिला: "भूतकाळाचे स्मरण असावे, पण भविष्याचा वेध अधिक महत्त्वाचा! यदि भारताला प्रगतिशील व्हायचं असेल, तर त्याला इतिहासाच्या सावल्यांपाशी ठेवलं पाहिजे."
नऊ महिने अंतराळात फिरत असताना सुनीता थकली होती. पृथ्वीवरच्या लोकांपासून दूर, अवकाशाच्या अथांग नीरवतेत तिचे मन गुंतवण्याचा ती प्रयत्न करत होती. तिने ध्यानधारणा करण्याचा मार्ग अवलंबला, कारण तेवढाच एक उपाय होता मन शांत ठेवण्याचा. पण एक दिवस त्या गूढ शांततेत, एका अद्भुत चमत्काराने तिला अचंबित केले. तिच्या ध्यान अवस्थेत काळ अचानक स्वतः दोन रूपांमध्ये प्रकट झाला!
एक बाजूला उभा होता भूतकाळ—इतिहासाच्या धुळीत न्हालेला, जुन्या आठवणींच्या ओझ्याने वाकलेला आणि थकलेला. दुसऱ्या बाजूला होता भविष्य काळ तेजस्वी, परंतु अनिश्चित आणि तरीही आकर्षक. ते एकमेकांकडे पाहत होते... हळूहळू त्यांचा सुनीता सोबत संवाद सुरू झाला.
भविष्य काळ चकाकत म्हणाला, "सुनीता, तुम्हा अमेरिकन लोकांना माझ्याबद्दल एवढं आकर्षण का गं? नवीन तंत्रज्ञान, अंतराळ मोहीमा, सतत पुढील दशकांची तयारी... नेहमी फक्त माझाच पाठलाग का?"
सुनीता हसली आणि उत्तरली, "कारण आम्ही मानव आहोत. आम्हाला सतत पुढे जायचंय. नव्या गोष्टी शोधायच्या, नवीन क्षितिजं गाठायची. स्वप्न, शोध, प्रगती, विकास... हीच तर आमची खरी ओळख आहे."
तेवढ्यात भूतकाळ खो खो हसत सुनीताकडे पाहत म्हणाला.
"हा! हे खरं असेल तुमच्याकडे, पण सगळीकडे नाही! एक देश आहे पृथ्वीच्या पाठीवर जिथं 'मी' अजूनही वर्तमान आहे!" भारत... इतर देश पुढच्या शतकाचा विचार करत असताना, इथे मात्र शतकां पूर्वीच्या थडग्यांचा गांभीर्याने विचार होत आहे!"
सुनीता चकित होत म्हणाली.
"पण का...?"
भूतकाळ गंभीर होत म्हणाला, "कारण तिथे सामाजिक गुरुत्वाकर्षण काहीतरी वेगळंच आहे! ३०० वर्षांपूर्वीच्या मृतांचे अवशेष तिथल्या लोकांना खाली ओढत आहे! त्यामुळे त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यांच्यासाठी कुणाचे तरी थडगे हा जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे. पण गंमत पहा, कोरोनाच्या काळात गंगेत तरंगलेल्या हजारो प्रेतांबद्दल यांना काहीच वाटलं नाही!
अवकाशातून सुनीताने भारताकडे पाहिले. तिच्या समोर तंत्रज्ञान, विज्ञान, रोजगार, आरोग्याच्या सोयी नव्हत्या,होता एक जमाव, जो ३०० वर्षापूर्वीच्या कबरीवर वाद घालत होता... जणू मृतांचा इतिहास उद्याच्या निवडणुकीत मतदान करणार होता.
सुनीताला हे स्पष्ट होते की, कोणत्याही देशाचा खरा विकास त्याच्या भविष्यातील स्वप्नांवर आणि त्या अनुषंगाने आज करावयाच्या कृतीवर अवलंबून असतो, भूतकाळा तील थडगे उखरण्यावर नव्हे ....
अंतराळात असतानाच तिने हा संदेश ध्वनिक्षेपकावरून पृथ्वीवर पाठवला....
"भूतकाळाचे स्मरण असावे, पण भविष्याचा वेध अधिक महत्त्वाचा ! जर भारताला खरोखर प्रगतिशील व्हायचं असेल, तर त्याने इतिहासाच्या सावल्या मागे सोडून उज्ज्वल भविष्याचा विचार करायला हवा."
- पंकज महल्ले

Post a Comment