मोबाईल ने उडवली ५१ टक्के भारतीयांची झोप
आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हे प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. संवाद, मनोरंजन आणि माहिती मिळवण्याचे साधन म्हणून त्याचा वापर वाढत असताना, त्याचे दुष्परिणामही आता समोर येत आहेत. जवळपास ५१% भारतीयांची झोप मोबाईल फोनने उडवली आहे. अर्थात आपण स्वतःच्या आत डोकावले तरी या म्हणण्यात तथ्य असल्याचे आपल्याला दिसेल.
'वेकफिट' या संस्थेने केलेल्या एका निरीक्षणानुसार, भारतातील ५१% नागरिकांची झोप मोबाईलच्या अतिवापरामुळे उडाली आहे. ही आकडेवारी आपल्या झोपेच्या आरोग्यावर आणि जीवनशैलीवर होणाऱ्या परिणामांबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. कारण जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी मोबाईलशिवाय आपण राहूच शकत नाही, असा याचा अर्थ आहे.
_ वेकफिटचे निरीक्षण काय सांगते?
वेकफिट ही एक भारतीय कंपनी आहे, जी झोपेशी संबंधित उत्पादने आणि संशोधनासाठी ओळखली जाते. त्यांच्या अभ्यासात असे दिसून आले की, मोबाईलच्या सततच्या वापरामुळे अनेक भारतीय रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. सोशल मीडिया, व्हिडिओ स्ट्रीमिंग, गेमिंग किंवा मेसेजिंग यामुळे झोपेच्या वेळेत कपात होते. यामुळे केवळ झोपेची कमतरता नाही, तर झोपेची गुणवत्ताही खालावत आहे. वेकफिटच्या या निरीक्षणातून हे स्पष्ट होते की, मोबाईलच्या स्क्रीनवरून निघणारा ब्लू लाइट झोपेचे चक्र बिघडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
_झोपेवर होणारा परिणाम
मोबाईलमधून निघणारा ब्लू लाइट मेंदूला सतत सक्रिय ठेवतो आणि मेलाटोनिन या झोपेसाठी आवश्यक हार्मोनच्या निर्मितीवर परिणाम करतो. वेकफिटच्या मते, ५१% भारतीयांना या कारणामुळे रात्री नीट झोप लागत नाही, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होत आहे. झोपेच्या अभावामुळे थकवा, चिडचिड, एकाग्रतेचा अभाव आणि दीर्घकाळात गंभीर आजारांचा धोका वाढतो. हा धोका वेळीच ओळखला तर आपण जीवघेण्या संकटातून बाहेर पडू शकू.
_ भारतीयांच्या मोबाईल वापराचे वास्तव
भारतात स्मार्टफोनचा वापर झपाट्याने वाढला आहे. स्वस्त डेटा आणि इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांमध्ये मोबाईलचा वापर वाढून आता हा वापर व्यसनात बदलला आहे. विशेषतः तरुण पिढी रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर व्यस्त राहते, ज्यामुळे त्यांचे झोपेचे प्रमाण आणि गुणवत्ता दोन्ही प्रभावित होत आहे. शरीराचे नैसर्गिक वेळापत्रक मोबाईलच्या अति वापराने बदलल्याने तरुण वयातच निद्रानाशासह अनेक गंभीर आजार तरुण पिढीत फोफावत आहे. नैराश्य, चिडचिड, अस्वस्थता, अस्थिरता, चंचलता या गोष्टी मोबाईलच्या अतिवापराने वाढल्या आहेत. वेकफिटच्या निरीक्षणानुसार, या समस्येचे मूळ तंत्रज्ञानाच्या अतिवापरात आहे.
_यावर उपाय काय
वेकफिटने या समस्येवर मात करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल वापर टाळावा, ब्लू लाइट फिल्टरचा वापर करावा आणि झोपेची नियमित वेळ ठरवावी. तसेच, बेडरूममध्ये मोबाईल न ठेवणे हा देखील एक प्रभावी उपाय आहे. या सवयी अंगीकारल्यास झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. शेवटी मोबाईल वापरासंदर्भात स्वतःची नियमावली तयार केली तरच आपण मानसिक, शारीरिक आरोग्य राखू शकतो.
मोबाईल हे आधुनिक जीवनाचे वरदान आहे, परंतु त्याचा अतिवापर आपल्या झोपेचे शत्रू बनत आहे. वेकफिटच्या निरीक्षणानुसार, ५१% भारतीयांची झोप उडवणारी ही समस्या गंभीर आहे. तंत्रज्ञानाचा वापर संतुलित करणे आणि आपल्या आरोग्याला प्राधान्य देणे हाच यावरचा खरा उपाय आहे. तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड झाल्यास मात्र कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ बिघडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे योग्य तो पर्याय निवडणे ही काळाची गरज आहे. आपली झोप परत मिळवण्यासाठी एवढे आपल्याला करावेच लागेल.
नाहीतर,
मुझे नींद ना आये,
मुझे चैन ना आये
कोई जाये जरा
धुंडके लाये ...
असे म्हणायची वेळ लवकरच येईल.
नितीन पखाले
9403402401

Post a Comment