इसाप, बिस्मिल्ला आणि आठवणींचे विषयांतर !
रात्री झोपताना मोबाईलवर रिल्स पाहू नये, त्याचे काय दुष्परिणाम असतात, हे सांगणारे खूप रिल्स पाहिले. त्यामुळे आपणही रिल्स पाहायचे नाही, आणि मुलालाही झोपताना मोबाईल पाहू द्यायचा नाही, असा निर्णय झाला. त्यामुळे त्याला वेगवेगळ्या कथा, कहाणी ऐकवून झोपवण्याचा अवघड टास्क रोज रात्री आम्ही पूर्ण करतोय. या दरम्यान, रामायण, महाभारत, अकबर बिरबल, विक्रम - वेताळ असं करत आमचा सिल्याबस आता इसापनितीमधल्या गोष्टीपर्यंत आला आहे .
परवा, इसापची गोष्ट सांगत असताना मला मात्र सतत बिस्मिल्ला आठवत राहिली. खुप वर्षानंतर इसापच्या गोष्टीमुळे ती आठवली. अर्थाअर्थी इसाप आणि बिस्मिल्ला यांचा काहीही संबंध नाही. पण, आपल्या हिप्पोकॅम्पसमध्ये न्यूरॉन काय घोळ घालून ठेवतील, याचा काही नेम नाही. नाहीतर तो इसाप कुठला आणि आमच्या गावातली बिस्मिल्ला कुठली !
मी लहान असताना माझ्या आईकडून पहिल्यांदा इसापचे नाव कळले. ती आम्हाला वेगवेगळ्या कथा सांगायची. त्यातले अकबर बिरबल आणि विक्रम वेताळ पेक्षाही इसापने जास्त लवकर मनात घर केले होते. कारण, हा इसाप आमच्याच गावात राहत होता, यावर माझे ठाम मत होते. त्यामुळे इसापची गोष्ट जास्त आवडायची.
आमच्या लहानपणी खेड्यातल्या दुपार आताच्या शहरी व्यस्ततेच्या तुलनेत निवांत आणि किंचितशा रुक्ष वाटायच्या. घरातले मोठी भावंडं, मोहल्ल्यातले मोठे पोरं शाळेत निघून जायचे. मजूर, शेतकरी शेतात. त्यामुळे खेड्यातल्या दुपारी या टिपिकल शांततेच्या, थोड्याशा आळसावलेल्या असायच्या. मला आठवते, अशाच एखाद्या दुपारी दरवाज्याच्या कडीचा आवाज यायचा. दरवाजा उघडेपर्यंत बाहेरून पाण्याच्या बालटीच्या कडीचा टकटक असा आवाज कानी पडायचा. दरवाजा उघडला की आईला मोठ्याने आवाज द्यायचो.... "बिस्मिल्ला आली"!
पाण्याच्या बकेटमद्ये पाणी नसायचं. अर्धी भरत आलेल्या बकेटमध्ये बहुतांश ज्वारी, काही डाळ आणि मिरचीच्या पुरचुंड्या असायच्या. बिस्मिल्ला दारात उभी. ' सो गई क्या रे छोक्रे तेरी माँ ? ' असं म्हणत घरात तिचे आगमन व्हायचे.
बिस्मिल्ला; चाळीस, पंचेचाळीसची असेल तेव्हा ती. जेमतेम उंची, गरिबीने गांजलेल्या देहावर वयाने केलेलं नक्षीकाम म्हणून चेहऱ्यावर सुरकुत्या. शेतातल्या मेहनतीने सावळ्या रंगाला दिलेला काळ्या रंगाचा मेकअप. गरिबीनेच आपला हिस्सा म्हणून पोषणाच्या तराजूत भुकेचे वजन टाकत जावे आणि त्यामुळे चाळीस किलोच्या आसपास अडलेली काया. शरीरावर तिच्या बेगैरतीला शोभेल अशी साडी. त्यावर हाप बाह्यांचे, लांब शर्ट म्हणावे असे ब्लाऊज. पिंजारलेल्या आणि तांबट मळकट केसांना साडीच्याच पदराचा आधार. बिस्मिल्ला आठवते ती अशी.
वर्षभरात कुठल्याशा सणाला ती आपल्या घरी खिचडा करायची. आई सांगायची ते आठवते. गावातून गोळा केलेले धान्य, त्यात मिळालेल्या डाळी वगैरे टाकून बनवलेली ती खिचडी असेल. तर, त्या दिवशी ती बकेट घेवून धान्य घ्यायला आली असावी. तशी ती अधूनमधून यायची. तिचे घर तिकडे, झोपडपट्टीत. इंदिरानगरात. शेतात मोलमजुरी करायची. शेतात काम नसेल तर कुठे घरकाम कर, तर कुणाचा मातेरा धुवून दे, असे मिळेल ते काम करायची. खिचडाचा महाप्रसाद घ्यायला या, म्हणून ती आवर्जून सांगायची. कुणी जायचे कुणी नाही.
वर्ष नेमके आठवत नाही. पण आमच्या गावात तोपर्यंत फक्त वसुदेवाच्या टोपलीतला बाळकृष्ण माहित होता. अजून रथयात्रेला निघालेला लालकृष्ण माहित झालेला नव्हता, म्हणूनही असेल कदाचित, पण बिस्मिल्लाच्या झोपडीच्या अंगणात, कुडाच्या आधाराने उठलेल्या पंगतीला गावातले मोठे लोकही दिसायचे. कुडाची भिंत म्हणजे तुराट्या आणि वाळलेल्या झाडांच्या काटक्याने उभारलेल्या आडोशाला शेणामातीने लिंपून बांधलेल्या भिंती. गरिबांच्या घराला विटांच्या भिंतीची हौस तेव्हा परवडणारी नव्हती. तिच्या घरी खिचडा खायला मोजके प्रतिष्ठित लोक असायचे. मात्र, इंदिरानगर हक्काने तिच्या घरी जेवायला असायचे. गरीबी ज्यांचा धर्म आणि भूक ज्यांची जात असते, त्यांना खिचडी आणि खिचडा यातला फरक समजत नसतो आणि त्यांना तो जाणून घ्यायचाही नसतो. ' जिंदगी खतरेमे ' हेच एक संकट असते त्यांच्या समोर.
तर त्या बिस्मिल्लासोबत मी कनेक्ट झालो ते मात्र इसापनितीवाल्या इसापमुळे. मला वाटायचे की ही बिस्मिल्ला त्या इसापची बायको आहे. कारण, तिच्या नवऱ्याचे नाव युसुफ होते म्हणे. मी त्याला कधीच पाहिलेले नव्हते. मला बिस्मिल्ला आठवते तेव्हापासून ती बेवाच होती. तर, गावात तिच्या नवऱ्याचे, युसुफचे नाव कुणी युसुफ घेतले असेल तर शप्पथ. खेड्यातल्या पद्धतीप्रमाणे त्याचे नाव मी ऐकले ते 'इसुप' असच. माझ्या पाच वर्षांच्या मेंदूने त्याचा लगेच इसाप करून टाकला होता.
खरेतर, बिस्मिल्लाचे नावही बिस्मिल्ला नव्हतच. ती आमच्या घरी यायची, तिला धान्य दिले, किंवा चहापाणी झाले की ' बिस्मिल्लाह उर रहमान उर रहीम' निघताना ती ' म्हणायची. म्हणून, कुणी तिचे नाव पाडले माहित नाही. पण, आमच्याकडे तिला सर्व जण बिस्मिल्ला म्हणायचे. तिचे खरे नाव वेगळेच काहीतरी असेल.
नंतर, गाव बेंबळा धरणाच्या बाधित क्षेत्रात गेलं. अख्खं गाव रफादफा झालं. सरकारी रीतीने गावाचे पुनर्वसनही झालं. गावात ज्यांची पक्के घरं होती होती त्यांना घर बांधण्यासाठी प्लॉट मिळाले. घराचाही मोबदला मिळाला. बिस्मिल्लाचे गावात घर नव्हते. त्यामुळे तिच्या पुनर्वसनाची सोय झाली नसेल. कारण, गावात ज्यांचे घर त्यांचेच पुनर्वसन, असा नियम. पण ज्यांचं गावात काहीच नाही, पण जगणे मात्र गावाच्या भरोशावर अशांच्या पुनर्वसनाचे कलम भूसंपादन कायद्याच्या अनुक्रमणिकेत काही दिसत नाही.
माझेही गाव सुटले. त्याला पंचवीस वर्षे उलटली. गावातले असंख्य चेहरे आता केवळ आठवणीच्या अल्बममध्येच दिसतात अधूनमधून. त्यावरची धूळ झटकली तरीही बिस्मिल्लासारखे चेहरे आठवणे कठीणच. जवळजवळ अशक्यच. अशातच 2016 मद्ये यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये कुणाला तरी रक्त द्यायला गेलो होतो. माझी मोठी बहीण अलकाताई सोबत होती. काम आटोपून बाहेर आलो तेव्हा माझी बहिण दवाखान्याच्या तिसऱ्या मजल्यावरून येताना दिसली. तिला विचारले, तर ती म्हणाली, ' एक बाई दिसली ओळखीची. तिच्या भेटीला गेली होती.
मी म्हंटले, कोण ? ती
म्हणाली,' "बिस्मिल्ला "!!
" इसापची बायको " ????
"नाही रे, इसापची नाही, युसुफची बायको " !
मी म्हटल, भेटायला पाहिजे.
बिस्मिल्लाच्या डोळ्यांचे ऑपरेशन झाले होते. मी वॉर्डात गेलो. थोडे शोधल्यावर बिस्मिल्ला दिसली . दवाखान्यातील कुबट, थंड आणि अंधुक वातावरणातही मला खेड्यातली, आमच्या बालपणीची दुपार आठवली. बिस्मिल्लाच्या पलंगाजवळ गेलो. तिचे नाव बिस्मिल्ला नव्हते हे कन्फर्म असले तरी तिचे खरे नाव काय हेच माहित नव्हते, म्हणून काय म्हणून हाक मारावी समजत नव्हते. पण मी सुरुवात केली.
' आप पहूर की रेहनेवाली है ना ' ??
गावाचे नाव ऐकल्या बरोबर सत्तरीत असलेली बिस्मिल्ला उठून उभी राहिली. " वो तो हमारा पुराना गाव है जी, अब मैं यहीच यवतमाल में रैती। आपने क्यू पूछा, मेरे को छुट्टी दे रहे क्या डॉक्टर ? '
बिस्मिल्लाने मला ओळखले नव्हते, ओळखण्याची शक्यताही नव्हती. तिला वाटले मी दवाखान्याचा कुणी कर्मचारी असावा. मग मी सांगितले, मी तुमच्या गावातला अमुकतमुक. यांचा पोरगा वगैरे. बिस्मिल्लाने मला ओळखले. मला मनगटाला धरून उभी राहिली. 'बापा, कित्ता बडा हो गया रे तू, मैं आती थी तो इत्तुसा था '!
माझ्या बहिणीने सांगितले होते, म्हणून मी तिच्यासाठी काही फळं आणि बिस्कीट घेवून गेलो होतो. ते तिला दिले. ' ये मेरे लिये लाये क्या रे तू, कायको लाया रे. इधर दो टाईम अच्छा खाना मिलता मेरे को, ! मी म्हंटले, रख लो, चाय के साथ खा लेना. परत फिरायला निघालो तर बिस्मिल्लाने रोखले. पुन्हा मला पकडुन वॉर्डातील इतर बायांच्या बेडजवळ नेले. थकलेल्या देहात कुठून इतका उत्साह आला माहित नाही, पण प्रत्येक म्हातारीशी ओळख करून दिली. ' देख ओ, ये कौन है ? ये हमारे गाव के सावकार का लडका है. उधर अमरावती मे रैता, बडी नोकरी लग गई बोलते. पेपर मे लिखता. मेरे लिये देख क्या लाया. मैं बोलती थी ना के मेरे गांव में भोत लोग पेचानते मेरे को, अभी इसकी बहन मिली मेरे को। उसने तो मेरे को बिन बताए पहचाना. देख।"
असं करत करत बिस्मिल्लाने मला पंधरा मिनिट वॉर्डभर फिरवले. मी परत निघालो तेव्हा घरच्या व्यक्तिला म्हणावे तसे म्हणाली, ' मैं अच्छी हू रे यहां पे, कल नही आया तो चलेगा. कुछ भी मत ला मेरे लिए। ये मैं अकेले कहा खाती, इन बाई को भी देती मैं, उनको मिलने के लिए कोई आता है न, तो वो जो कुछ लेके आते, मेरे को भी देते वो लोग।'
आपलं काम आटोपून लगेच निघायच्या विचारात मी असताना ती म्हणाली, 'उद्या नाही आला तरी चालेल.' मी तरी उद्या कुठे मुद्दाम भेटायला येणार होतो. पण, तिने तसे म्हणताच पुन्हा तिच्या जवळ गेलो. मुद्दाम पाच मिनिट तिच्या बेडवर बसलो. ती जे काही बोलत होती ऐकत होतो. लहानपणी तिच्या हातचा खिचडा खायचा राहून गेला होता. तिला म्हटले, ' एक बिस्कीट मेरे को देव, तुम भी खाव. भूक लगी है ! बिस्मिल्लाने भरभर पुडके हुसकून बिस्कीट काढले. मला दिले. परत येताना तिच्याकडे पाहण्याची हिंमत झाली नाही. पण, बाहेरून व्हरांड्याच्या खिडकीतून पाहिले इतर पेशंट बायांना ती बिस्कीट वाटत होती. बिस्मिल्लाच्या अंगणातली खिचडाची पंगतच बसली होती.
तिला भेटून परतल्यावर माझ्या बहिणीने विचारले, की काय म्हणे तुझ्या इसापची बायको.
मी म्हणालो, ' बिस्मिल्लाह उर रहमान उर रहीम'।
आता बिस्मिल्ला कुठे आहे माहित नाही, असेल किंवा नाही हेही माहित नाही. पण इसापची कथा आठवली की बिस्मिल्ला आठवते. आठवणींना विषयांतराचा भारी मोह. आज रुद्रादित्यला इसापऐवजी बिस्मिल्लाची कहाणी सांगतो.
अतुल विडूळकर
Atul Vidulkar

Post a Comment