यवतमाळ – महायुती सरकारकडे सर्वाधिक संख्याबळ असतानाही ‘ऑपरेशन टायगर’ मोहीम सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या संदर्भात पत्रकारांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना छेडले असता, त्यांनी ‘आगे आगे देखो, होता है क्या?’ असे उत्तर दिल्याने राज्यात पुन्हा एकदा पक्ष फुटीची मोठी घटना घडण्याचे सुतोवाच आहेत.
आज बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत संजय राठोड यांनी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेची माहिती दिली. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी वणीत केलेल्या आरोपांबाबत विचारण केली, तेव्हा पुढे काय होणार हे बघत राहा, असे उत्तर मंत्री संजय राठोड यांनी दिले. शिवसेना उबाठाचे आमदार, खासदार यांना आमीषं दाखवून प्रसंगी दबाव आणून राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ मोहीम राबविली जात असल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय देशमुख यांनी वणी येथील सत्कार कार्यक्रमात नुकताच केला होता. तसेही गेल्या महिनाभरापासून शिवसेना उबाठाचे काही खासदार शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दिल्ली येथे शिवसेना उबाठाचे चार खासदार शिंदे गटाच्या खासदारांनी आयोजित केलेल्या ‘डिनर डिप्लोमसी’मध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे शिवसेना उबाठामध्ये अस्थिरता असल्याचे बोलले जाते.
यवतमाळातही शिवसेना उबाठा गटातील स्थानिक पदाधिकारी लवकरच शिवसेना शिंदे गटात दाखल होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे मंत्री संजय राठोड यांनी शिवसेना उबाठाच्या नेत्यांना एक प्रकारे इशाराच दिल्याचे मानले जात आहे.

Post a Comment