Nature

वेदनेचे कडवे सत्य

 आज १९ मार्च. आजच्याच दिवशी १९८६ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी कुटुंबासह आत्महत्या केली होती. महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून याची नोंद झाली. तेव्हापासून आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांनी शेतीविरोधी धोरण, कर्जबाजारी, सावकारी अशा अनेक कारणांनी आत्महत्या केल्या. आज किसनपुत्र आंदोलनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एक दिवस अन्नत्याग आंदोलन केले जात आहे. या शेतकरी सहवेदना दिवसाच्या निमित्ताने, शेतकरी आंदोलक, सामाजिक कार्यकर्ते विजय विल्हेकर यांच्या 'फकिरीचे वैभव' या पुस्तकातील हा लेख.




जाणिवा जाणिवांना भिडल्या की मेंदूत वेदनेची नोंद निर्माण होते. जाणीवस्पर्श, घर्षण यांशिवाय जाणिवा निर्माणच होत नसाव्यात. संपूर्ण जागृत अवस्थेत आपल्याला माहीत असते, ही चित्रपटातील कृत्रिम, भाडोत्री पात्र आहेत. हे माहीत असूनही, चित्रपट प्रसंग मनाला भारावून टाकतो. आपल्या जगण्यातील तीव्र वेदनेसोबत साधर्म्य असल्यानं, हे प्रसंग मनाला चाटून जात असावेत.

आत्महत्या म्हटली, की ती जणू आपणच केली असा क्षणभर भास होतो. परजीवाचा अनाठायी मृत्यू, आपल्या जिवाला जाऊन भिडतो. आत्महत्या करणाऱ्यांना कारण ठरलेल्या तमाम विवंचना आपल्यालाही असल्यानं, त्या थेट काळजात घुसतात. थैमान घालतात. सैरभैर करतात. मनात, मेंदूत प्रचंड घुसमट, तळमळ निर्माण करतात. फक्त या विवंचनांकडे बघण्याची वेदनादृष्टी असली म्हणजे जाणिवा प्रखर होतात.

समग्र पोशिंद्यांच्या पुनरुत्थानासाठी, लढण्यासाठी उभ्या केलेल्या लढवय्या फौजा, लढ्याचं मैदान सोडून मरणमार्गानं जातात. क्रांतीचा पाऊस पाडण्याऐवजी मरणसड्यासारखे सांडतात. याचा अपराधबोध सर्वांग बधिर करून जातो. आपण संपूर्ण हरल्याचा भास होतो. पण एखाद्या श्रीमती उज्ज्वलासारख्या, एकविसाव्या वर्षी वैधव्य आलेल्या लेकरानं प्रचंड श्रम, संघर्ष करून म्हातारी सासू व दोन चिमुकल्यांना पोसलेलं पाहून मनाला उभारीही येते. तिचा एकाकी लढा आपल्याला ऊर्जा देऊन जातो.

ज्या सत्ताकारण्यांच्या, राजकारण्यांच्या न्यायाधिकरणात हा आत्महत्येचा प्रश्न खितपत पडला आहे, ज्यांची शेती अर्थदृष्टी बदलायची इच्छाच नाही; त्यांना शेतीशोषित धोरणं माहीत असूनसुद्धा नासमजसारखे भासवतात, वागतात, बोलतात; नव्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात, युगात जागेवर बसून पाहण्याची सोय असताना दुष्काळउत्सव दौरे करतात. आत्महत्यासारख्या राष्ट्र अपमान करणाऱ्या मरणप्रसंगाचे सोहळे साजरे करताना दिसतात. आत्महत्याग्रस्त भागांचा दौरा हा एखाद्या पर्यटनस्थळाला भेट देण्यासारखे राजकारण्यांना वाटते. वेदनेच्या कडव्या अंतर्दाहाला उत्सवाचे रूप आणतात, त्या राज्यकर्त्यांच्या असंवेदनक्षम दांभिकतेची किळस येते. आत्महत्यांबाबत प्रशासकीय अहवालांनी तर आत्महत्येच्या कारणांबद्दल कहरच केलेला दिसतो. अधिक दारू पिण्यामु‌ळे, आळशीपणामुळे, लग्न समारंभांमुळे, नियोजन नसल्यामुळे, घरगुती भांडणतंट्यामुळे आत्महत्या होतात, अशी प्राथमिक मरणमीमांसा केली जाते. ती अतिशय वेदना देणारी असते.

आत्महत्त्येसारखा प्रसंग आपल्या जिव्हारी लागून जातो. त्यासाठी जिवाचे रान करून आपण धावपळ करतो. पोशिंद्याच्या आत्महत्येच्या समस्येची दारू, मुलांच लग्न, आळशीपणा, तंत्रज्ञानाचा अभाव, नैसर्गिक शेतीचा अभाव, सिंचन अभाव, मानसिक आजार, आनुवंशिकता अशी अनेकरूपी कारणमीमांसा केली जाते. काही मंत्र्यासंत्र्यांनी तर, प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या होतात, अशी विधानं करून आत्महत्या केलेल्या तीन लाख पोशिंद्यांचा किळसवाणा अपमान केला. अर्थातच, हे निर्ढावलेपण शेतकरीशक्ती दुभंगण्यामध्येच दडलेलं आहे. नाही तर मतांचे राजकारण करणाऱ्यांची काय बिशाद, की ते सत्तर टक्के असलेल्या मतदारांच्या, शेतकऱ्यांच्या, अन्नदात्यांच्या आत्महत्यांवर हास्यास्पद शेरेबाजी करतील?

सरस्वतीमाय म्हणे, 'चलती के यार, मिले दो चार.' चलतीसोबत सर्वच असतात, पडतीसोबत कोण असतं? आम्ही तर सदासर्वकाळ पडतीचाच ठेका घेतलेला. उद्ध्वस्त, आत्महत्याग्रस्त, मातीत गेलेली माणसं काय कामाची ? यांच्या बाजूनं कोण उभं राहील? त्यासाठी आम्ही आहोत ना! आम्ही अगदी निष्ठेनं, जिद्दीनं, ठामपणे भूमिका घेऊन ताठ उभे !

एकीकडे शासन-प्रशासनाची आत्महत्येविषयी टिंगलटवाळीची भूमिका. ज्या ग्रामीण घरांत हा मृत्यूचा हैदोस होत आहे, त्या कुटुंबांतील, गावांतील विद्वान लोकसुद्धा आत्महत्येची वेगळीच कारणं शोधण्यात मश्गूल ! शेतीविरोधी धोरणांमध्ये कारण शोधत बसणं त्यांच्यासाठी बुद्धिकक्षेबाहेरचं काम. म्हणून आपली, त्यांच्या कक्षेतलीच कारणं शोधण्याचा पायंडा. बायकोसोबत भांडण झालं, बापलेकाच हुज्जतबाजी झाली, मुलीनं शिक्षण खर्चाकरता भांडण केलं, पोरीचं लग्न धुमधडाक्यात केलं - अशा किरकोळ कारणांतच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गावकुसानंसुद्धा बंदिस्त केलेला !

अशा विदारक परिस्थितीमध्ये आमचं आपलं आत्महत्याग्रस्त कुटुंबांमध्ये जाऊन त्यांचं सांत्वन करणं, २६ जानेवारी व १५ ऑगस्ट या गणतंत्र व स्वातंत्र्यदिन आत्महत्याग्रस्त अंगणांत राष्ट्रध्वज उभारणं, गावांची सहानुभूती जागृत करणं, वेदनायात्रा काढणं,

आत्मबल वाढवणं, आत्महत्याग्रस्तांच्या अस्थि एकत्र करून दक्षिण भारतात नेऊन त्यांचं दुःख रस्त्यावर आणणं, त्यांच्या वारसदाराना नुकसानभरपाई मिळवून देणं, त्यांच्या शिक्षणपाण्याची व्यवस्था लावून देणे, त्यांच्या आजारासाठी दवाखाना, मुलाबाळांचे लग्नप्रसंग अशी अनेक किरकोळ मलमपट्टीची कामं कर्तव्य म्हणून सातत्यानं करणं, यात अशा परिवारांचा खोलवर संपर्क व्हायचा. वेदनेच्या कक्षा रुंद व्हायच्या. दुःखजाणिवा प्रबळ व्हायच्या. या कृतिशीलतेमुळे, आत्महत्या या विषयातील आम्हाला खूप कळतं, असं प्रसारमाध्यमांना वाटायचं.

संवेदनशील पत्रकार उमेश अलोने, जयेश जगड आत्महत्या आकलनासाठी प्रसारमाध्यमांची टीम घेऊन आले होते. त्यांना नव्या आत्महत्याग्रस्त तरुण शेतकऱ्याकडे न्यायचं होतं. आमचंही त्यांच्याकडे जायचं राहुन गेलं होतं. या निमित्तानं दोघांची सोबत भेट होते म्हणून हे गाव निवडलेलं. फाट्यावर बस थांबली. गाव थोडे आत होते. फाट्यावरच एका हॉटेलात चौकशी केली "या दहा-पंधरा दिवसांअगोदर गावात शेतकरी आत्महत्या झाली, त्याचं घर कुणीकडे आहे?" घर सांगायचं दूरच राहिलं. तो उद्धटपणे म्हणाला, "ती कशाची शेतकरी आत्महत्या ! दारुड्या होता तो! सर्व गावाला काव आणला होता त्या माणसानं। म्हटलं, बरं झालं, मेला! गावाची कटकट मिटली. या गल्लीतून पुढं गेलं, की सर्वांत शेवटी त्याचंच घर आहे. घरी कुणी नाही. बदनसिब त्याची बायको अन् एक लेकरू आहे. माय-लेकराचा वनवास केला दारुड्या वानाच्या माणसाने." आणखी एक शिवी हासडून तो मोकळा झाला. कितीही वाईट माणूस मेल्यावर, चांगलं बोलण्याची प्रथा असताना, या तरुण शेतकऱ्याची मेल्यावरही थट्टा सुरू होती. पण मला या वेदनेची खोली मोजायची होती.

इत्थंभूत माहिती इथंच मिळाल्यानं आत गावात जाऊन, उगीच भेट घेण्याचं काहीच कारण नव्हतं. पण माझ्यासाठी ही मृत्यूची टिंगल थांबवणं हे एक आव्हान होतं. प्रसारमाध्यमांसमोर, या बाष्फळ विनोदामुळे चुकीचा संदेश जाण्याची स्थिती निर्माण झाली होती. निकरानं, "चला जाऊन तर पाहू" म्हणत तिच्या-त्याच्या घराच्या दिशेनं निघालो. अनेक गाववळणं पार करत एका घरवजा झोपडीत विचारलं, "या माणसाचं घर कुठं आहे?" बाजूच्या झोपडीकडे बोट दाखवत म्हातारी म्हणाली, "हेच होय घर ! त्या वायशा, बिनडोक, दारुड्या माणसाचं लय साजरं काम केलं! चांगल्या जवान पोरीचा अन् लेकराचा संसार उद्ध्वस्त केला साईच्यानं. कॅमेऱ्याकडे पाहून चांगले फोटो काढा. द्या पेपरात. लयच मोठेपणा केला त्यानं," म्हणत खेकसली.

ही सर्व गावातील प्रतिक्रिया होती. प्रत्यक्ष त्याच्या अभागी बायकोची काय प्रतिक्रिया राहते? संपूर्ण संभ्रमावस्था होती. तिनं चिडून काही फेकून मारलं तर?

पत्रकारांना लागता कामा नये, म्हणून मीच पुढे गेलो. काय? कसं? कशी सुरुवात करावी? काही सुचत नव्हतं. विचारा-विचारातच तिच्या अंगणात पोहोचल्याबरोबर ती कडेवर लेकरू घेऊन बाहेर आली आणि जोरानं रडायला लागली. रडायलासुद्धा सोबत लागते. एकटी व्यक्ती जशी भावना व्यक्त करू शकत नाही, बोलू शकत नाही. तसं एकट रडूसुद्धा शकत नाही. तिला रडण्यासाठी कुणाच्या तरी हजेरीची नितांत गरज होती. ती आम्ही अकस्मात येऊन पूर्ण केली होती. रडता रडता ती चिडायला लागली. रडत-रडतच नवऱ्याच्या जीवन संपवण्याला शिव्या हासडत होती. नाना प्रकारच्या तक्रारी करत होती. आल्यादारी तिचं ऐकुन घेणं भाग होतं. अखेर रडून रडून, बोलून-बोलून शिव्या देऊन थकली, थांबली. तिच्या शिव्या-शापाचा अर्थ मला कळला होता. प्रचंड घृणा करून, जिवाच्या माणसाला विसरण्याची ही साधी सोपी उपचारपद्धती असेल कदाचित !

ती रडायची थांबताच शांततेचा फायदा घेत मी प्रश्न केला, "का गं ताई, तुझ्या आई-बाबांनी अशा दारुड्या माणसासोबत कसं काय लग्न लावून दिलं?" त्यावर तिनं जोराचा हंबरडा फोडला. आतून हुंदका देत म्हणाली,

"नाही जी, तेव्हा ते दारू पीत नव्हते. चांगली शेतीवाडीत मेहनत करायचे. होतकरू नवरा मुलगा, पुढं जाणारा मुलगा असं मध्यस्थानं सांगितलं होतं अन् होताही तसाच. सुपारीचं खांडसुद्धा खात नसे. कोरडवाहू शेतात विहीर खोदली. विहिरीसाठी कर्ज काढलं. विहिरीला बकेट बुडंन एवढंच पाणी लागलं. असं झालं तेव्हापासून शेतात नाही, तर घरात राहणारा माणूस नाही शेतात, नाही घरात! मधात गावातच राहत असे. मी त्यांना गावात, घरात बसण्यापेक्षा बाहेर शहरात मोलमजुरी करायला जाऊ असं सुचवत होती. त्यावर ते म्हणत, एवढं मोठं कर्ज फिटणार आहे काय? कर्जाचा, नापिकीचा तगादा वाढत गेला आणि सुपारीचं खांड न खाणारा आमचा घरचा माणूस, रोज दारू पिऊन यायला लागला. कधीच न मारणारा, मारायला लागला. सारी अवदसा घरात घुसली. अजूनही दारूच पेत राहायला पाहिजे होतं. जीव कशाला द्यायला पाहिजे होता?" असं म्हणत पुन्हा हंबरडा फोडून रडायला लागली. क्षणभरापूर्वी मेल्या नवऱ्याला शिव्याशाप देणाऱ्या बायकोचा तीव्र, पण करुणामय अंतर्दाह व्यक्त झाला. पत्रकार अवाक् झाले.

शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाकडे वरपांगी पाहता येत नाही. त्यातलं सत्य शोधण्यासाठी, वेदनेच्या खोलीत गेल्याशिवाय कळत नाही, याची प्रत्यक्ष-विदारक, जीव पिळवटून टाकणारी, मानवी मनाला प्रचंड हादरा देणारी ही अनुभूती आहे.

ही जाणीवसंवेदना, मानवी ओलावा, सरकारात बिगरसरकारात असणाऱ्या तमाम राज्यकर्त्यांना नखभर प्रभावित करून गेली, तर शेतीशोषणाच्या मुलभूत धोरणामध्ये निर्णायक बदल घडून येऊ शकतात. नाही तर आपल्याच जीवन-मरणाच्या प्रश्नाकरता, आता शेतकऱ्यांची लढण्याची क्षमता उरलेली नाही. तो हतबल, आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला. तर सर्व बिगरशेती क्षेत्रातील संवेदनशील डॉक्टर, व्यापारी, नोकरदार, कवी, साहित्यिक, पत्रकार, चित्रपटकार, अभिनेते, समग्र नागरिक यांनी सतत जीवन संपवण्याचा विचार करणाऱ्या पोशिंद्याला, अन्नदात्याला वाचवावे लागेल. ही काळाची नितांत गरज आहे.


                                                        - विजय विल्हेकर  

                                                  (फकिरीचे वैभव या पुस्तकातून साभार)


Post a Comment

Previous Post Next Post