Nature

महिला दिन विशेष : बदलाची सुरुवात आपल्यालाच करावी लागेल....

 महिला दिन विशेष...




बरोबर दोन महिन्यांपूर्वी माझ्या जगातल्या सर्वात आवडत्या माणसाला - लिंगूला मुलगी झाली आणि आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक प्रचंड मोठा आनंद आला. गेले दोन महिने माझ्या डोक्यात याच निमित्तानं काही विचार घोळतायत. ते मांडावेसे वाटले.

मी आणि दीपिका एकदा आपल्याला मूल हवंय का अशी चर्चा करतो होतो. आम्ही नेहमीप्रमाणं त्याचे मुद्दे मांडले. ‘मूल असावं’च्या बाजूपेक्षा ‘नसावं’ च्या बाजूला जास्त मुद्दे झाले. त्यातला एक मुद्दा होता, कसल्या जगात आपण मूल जन्माला घालायचं? आणि मुलगी झाली तर? भारतात काय, जर्मनीत काय किंवा अजून कुठं काय… जग फारसं बरं राहिलेलं नाही त्यामुळं मूल नको यावर आमचं एकमत झालं. 

मग लिंगूला मुलगी झाली म्हटल्यावर माझ्या डोक्यात पुन्हा हे विचारांचं चक्र सुरू झालं. असं वाटलं, की जग वाईट आहे म्हणून मूल नको हे बोलणं काही बरोबर नाही. चुकीचंच आहे. आपण या जगात राहतो आणि जे वाईट आहे, ते सुधारायची जबाबदारी आपलीच आहे.

पण आहे हे जग कसं सुधारायचं? विशेषतः मुलींसाठी - त्यांच्यासाठी एक चांगलं जग कसं उभं करायचं? हे प्रश्न मनामध्ये उभे रहायला लागले. त्यानिमित्तानं मला काही गोष्टी इथं सांगाव्याश्या वाटतात. काही बायकांच्या. अर्थात एक सोडून त्यांची नावं नावं मी सांगणार नाही. कारण मी लिहितोय ते अतिशय पर्सनल आहे.

तर पहिली बाई. तिनं तिच्या अनुभवांबद्दल आधी लिहिलंही आहे त्यामुळं ते इथं मी लिहिणं मला गैर वाटत नाही. तर ही लहान असताना तिला घरी शिकवायला एक शिक्षक यायचा. तिला शाळेत जायला आवडायचं पण खाजगी शिकवणीची वेळ झाली की तिच्या उरात धडकी भरायची. का? अभ्यास करायचा नाही म्हणून? नाही. शिकवणी घ्यायला तिच्याच वाड्यात येणाऱ्या या शिक्षकाची तिला भीती वाटायची. तो मारायचा नाही. पण गैरप्रकार करायचा. ती हुशार होती, उच्छृंखल स्वभावाची होती पण या प्रकारानं बुजून गेली. घरी सांगितलं तर आपलीच चूक आहे म्हणून आपल्याला मारतील, रागावतील म्हणून तिनं सांगितलंच नाही. पण जेव्हा असह्य झालं तेव्हा सांगितलं. तिला वाटलं त्याला शिक्षा वगैरे होईल पण तसं काहीच झालं नाही. वडिलांनी त्या शिक्षकाची शिकवणी बंद केली इतकंच.

ही बाई म्हणजे माझी आई. या घटनेनं तिच्यात अमूलाग्र बदल झाला. या असल्या पुरुषी अहंकाराविषयी एक घृणा तयार झाली आणि मग मुलींची छेड काढणाऱ्यांना चप्पल काढून मारणं तिनं चालू केलं. एकदा तर कृष्णा नदीच्या पुलावरून एका मुलाला, तो सांगून ऐकत नाही म्हटल्यावर तिनं नदीच्या पात्रात ढकललं होतं. पुढं मोठी झाल्यावर या माया पंडितनं काय केलं हे तिच्या आजूबाजूच्या सर्वांना ठाऊकच आहे. 

तर लैंगिकतेबद्दलचं शिक्षण मला आईकडून मिळालं. चांगला स्पर्श कोणता, वाईट कोणता, छेड काढणं म्हणजे काय, बलात्कार म्हणजे काय, मासिक पाळी म्हणजे काय हे माझ्या लहानपणात तिनं मला समजावून सांगितलं. मला आठवतं, की आई जनवादी महिला संघटनेत काम करायची तेव्हा झोपडपट्टीत जाऊन बायकांना मारणाऱ्या नवऱ्यांना दम द्यायची, त्यांचं कानफाड फोडायची, पोलिस केसेस करायची. झोपडपट्टीच कशाला? आम्ही लहान होतो तेव्हा विद्यापीठात आमच्या कॉलनीत घरासमोर एक प्राध्यापक राहायचे. ते रोज रात्री आपल्या बायकोला मारायचे. त्यांनाही तिनं अनेकदा थांबवल्याचं मी पाहिलंय. आमचे आजोबा, त्यांना आण्णा म्हणायचे, त्यांनी माझी मोठी बहीण - दीदी साधारण १७-१८ वर्षांची असताना तिला थप्पड मारायला हात उगारला होता तेव्हा आईनं त्यांचा हात धरून, “खबरदार, या घरात मुलींवर हात उचललात, तर माझ्याइतकं वाईट कोण नाही” असा स्वतःच्या सासऱ्यांना दम भरला होता. आई सोबत मला राजकीय कार्यक्रमांना, भाषणांना घेऊन जायची. कंटाळा यायचा. एकदा उडान नावाच्या सीरियलमधली अभिनेत्री कविता चौधरी आली असताना ती मला त्या कार्यक्रमाला सांगलीला घेऊन गेली होती. मी आणि माझ्या भावानं घड्याळात वेळ लावली होती. आई त्या कार्यक्रमात स्त्रीमुक्तीवर २ तास ६ मिनिटं बोलली होती. त्यावरूनही आम्ही तिची नंतर खूप चेष्टा करायचो पण तिची तळमळ तिच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक अशा दोन्ही अनुभवांमधून आली होती.

आईमुळं माझं याबाबतीत चांगलंच शिक्षण होत होतं. ती प्रत्यय नावाच्या संस्थेच्या नाटकांमध्ये खूप ॲक्टीव्ह असायची. मी तिच्याबरोबर गाडीवर मागं बसून तालमींना जायचो. प्रायव्हेट हायस्कूलमध्ये रात्री ९ नंतर तालमी असायच्या. विद्यापीठातून प्रायव्हेट हायस्कूलकडं जाणारा रस्ता “डोंबारवाडा” नावाच्या एका भागातून जायचा. तिथून गेलं की काहीतरी विचित्र वाटायचं. का ते कळायचं नाही. मी सातवी किंवा आठवीत असेन. एकदा न राहावून मी आईला विचारलं, की या बायका पावडर, लिपस्टिक लावून, गजरे घालून, चकचकीत साड्यांमध्ये अशा रस्त्यांवर, गटारांच्या कडेला का बसलेल्या असतात? इतर आयांनी आपल्या मुलांच्या अशा प्रश्नांना कसं उत्तर दिलं असतं मला माहित नाही, पण मला लख्ख आठवतं आई त्या दिवशी काय म्हणाली होती ते. ती म्हणाली, त्या बायकांना वेश्या म्हणतात. मी म्हटलं वेश्या म्हणजे काय? तर मी म्हणाली, या गरीब बायका असतात, घरी खायला प्यायला नाही, आईबापही टाकून देतात. मग जगण्यासाठी त्या आपल्याकडचं सगळं विकतात. ते सगळं विकून संपलं की विकायला काहीच उरत नाही. मग त्या आपलं शरीर विकतात. मला त्यावेळी याचा नेमका अर्थ समजला नव्हता. पण मग एक-दोन वर्षातच आईला नेमकं काय म्हणायचं होतं हे माझ्या लक्षात आलं. हे मी सांगण्याचं काय कारण? कारण या अशा शिक्षणामुळं माझ्या डोक्यात काही बीजं रोवली गेली होती. हिंसा म्हणजे काय, महिलांविरोधी हिंसा म्हणजे काय, बलात्कार म्हणजे काय, चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, चांगली नजर, वाईट नजर वगैरे वगैरे. या शिक्षणाची मला पुढच्या आयुष्यात, म्हणजे मी मोठं होताना खूप मदत झाली.

आमची एक लहानपणची मैत्रीण होती. आम्ही सगळेच मस्तमौला होतो, तशीच तीसुद्धा होती. पण कधीकधी ती खूप दुःखी दिसायची. हे मी अगदी लहानपणचं सांगतोय… म्हणजे मी सहावीत वगैरे असेन तेव्हाचं. कधी खेळायला यायची नाही. कधी मला ती खिडकीतून रडताना दिसायची. तिची आई म्हणायची तिला बरं वाटत नाहीए, ती नंतर खेळायला येईल. नंतर खेळायला आलो की आम्ही तिची चेष्टा करायचो… एवढंसं बरं नाही म्हणून खेळायला येत नाही वगैरे. ती काही बोलायची नाही. पण अर्थात मुलं खेळायला लागली की बऱ्याच गोष्टी विसरतात तशी ती आपली दुःख विसरून खेळायची.

आम्ही मोठे झालो. आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. ती दुसऱ्या गावाला कॉलेजला गेली. तिनं एकदा मला पत्र लिहिलं. त्यात अनेक गोष्टींसोबत तिनं हेही लिहिलं होतं… “तुला आठवतं आपण लहान असताना मी सारखी आजारी पडायचे आणि मग तुम्ही सगळे माझी चेष्टा करायचा ते? मला आज त्याबद्दल तुला सांगायचंय.” ती आजारी पडायची तेव्हा तिचे आई-वडील तिला एका डॉक्टरकडं घेऊन जायचे. तो त्यांना बाहेर बसायला सांगायचा आणि पडदा ओढून घ्यायचा. तिचा छळ करायचा. ती तेव्हा फक्त तिसरी-चौथीत होती. सात-आठ वर्षांची. ती तोंड घट्ट मिटून घ्यायची. थोड्या वेळानं डॉक्टर तिला सोडायचे आणि बरी नाही झाली तर पुन्हा घेऊन या असं तिच्या आईवडिलांना सांगायचे. म्हणून त्यानंतर तीन चार दिवस ती एकदम दुःखी असायची. हे लिहिताना आजही माझ्या अंगाचा तिळपापड होतोय, संतापानं अंग थरथरतंय, डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहिलेत. 

मी तिला फोन केला. भेटायला येऊ का विचारलं? तिला परगावाला तिच्या कॉलेजमध्ये भेटायला गेलो. तिनं मला तिच्या मैत्र मैत्रिणींची ओळख करून दिली. तिला आवडणाऱ्या मुलाला भेटवलं आणि मग नंतर आम्ही कॉफी प्यायला गेलो. खूप बोललो. तिला होणारं दुःख, वेदना, राग, शरम, संताप, किळस… सगळं ती इतकी वर्षं मनामध्ये ठेवते. तिला याबद्दल कोणाशीही बोलता येत नाही. पण ती सायकॉलॉजिस्टला भेटली. तो म्हटला कुणाशीतरी बोल. तिला माझ्याशी बोलावंसं वाटलं. मी विचारलं, मला का सांगावंसं वाटलं? तर म्हणाली, तू एकटाच समजून घेशील असं वाटलं म्हणून तुला सांगितलं. मला वाटतं, माझ्या आईनं मला दिलेली शिकवण यासाठी कारणीभूत असावी.

पुढं तिचं लग्न झालं. नवरा, ती दोघंही सुखात होते. पण एक अडचण होती. तिला लैंगिक संबंधांची भीती वाटायची. तिचा नवरा जवळ आला, की थरथर कापायची. तिला लहानपणचा तो डॉक्टर आठवायचा. पण तिच्या नवऱ्यानं समजून घेतलं. अर्थात कधीकधी तो चिडचिड करायचा पण दोघांनीही थेरपी घेतली. त्याबद्दल बोलले. त्यांचं पुढं काय झालं हे महत्त्वाचं नाही. पण एका घाणेरड्या पुरुषामुळं ज्या गोष्टीतून अतीव सुख, समाधान मिळायला हवं, त्याच गोष्टीची तिला अनेक वर्षं भीती वाटायची. अजूनही तिला दु:स्वप्नं पडतात. एकटी असली की रात्री कोयता जवळ ठेवून ती झोपते.

आता दुसरी मैत्रीण. ही माझ्या कॉलेजमध्ये माझी मैत्रीण झाली होती. नवीनवीच मैत्री झालेली. अतिशय आनंदी स्वभावाची मुलगी. खूप हसायची. गोडही होती. मी लगेच तिच्या प्रेमात पडलो. याआधी मला एक मैत्रीण नाही म्हणाली होती. तर ती तेव्हा सतरा वर्षांची होती आणि मी अठरा. आम्ही खूप वेळ एकत्र घालवायचो. मी आणि माझा भाऊ तेव्हा पुण्यात एका छोट्या फ्लॅटमध्ये रहायचो. आमच्याबरोबर तेव्हा आमचा कुत्राही रहायचा. त्याचं नाव रेक्स. तिनं रेक्सच्या खूप कहाण्या आमच्याकडून ऐकल्या होत्या. ते कुत्रं स्पेशलच होतं. एकदा म्हणाली, मी रेक्सला भेटायला येऊ का? मी तिला गाडीवरून घरी घेऊन गेलो. संध्याकाळचे साडेसात वगैरे वाजले होते. ती रेक्सला भेटली. त्याच्याबरोबर खेळली. त्याला ती आवडली म्हटल्यावर तर माझ्या हृदयात संगीत वगैरे वाजायला सुरुवात झाली होती. आता हिच्याबरोबर मी पहिल्यांदाच एकांतात. हृदयात धडधड. जिभेला कोरड इत्यादी सगळे ठरलेले प्रकार सुरु झाले होते. मग मी तिला विचारलं, चहा घेणार काय? ती हो म्हणाली. मी चहा करताना जवळ येऊन उभी राहिली. तिनं चहा करणारे पुरुष यापूर्वी बघितले नव्हते म्हणून तिला खूप गंमत वाटली. मी स्वयंपाकही करू शकतो म्हणून मी तिला इम्प्रेस करायचाही प्रयत्न केला. पण इतकी भोळी होती, की मलाच म्हणाली, माझ्यापेक्षा जास्त चांगला स्वयंपाक तू करूच शकत नाहीस. असं म्हणून ती इतकी गोड हसली की तिला जवळ घेऊन तिची पापी घ्यावी असं मला वाटलं. पण माझा धीर झाला नाही म्हणण्यापेक्षा तसं करणं चुकीचं होतं हे मला जाणवत होतं. मी कॉलेजमध्ये गेल्यावर आईनं मला याबद्दलही शिकवण दिली होती. कुठल्याही मुलीला तिच्या परवानगीशिवाय स्पर्श करायचा नाही. आणि ती जर नाही म्हणाली, तर नाही म्हणजे नाही. हे सगळं डोक्यात फिक्स होतं.

मग रात्री मी तिला तिच्या पीजीवर सोडायला गेलो. जाताना टिळक रोडवरच्या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरलं. मी गाडी बाजूला घेतली. पण किक मारली नाही म्हणून तिनं विचारलं काय झालं! मग मी धाडस केलं आणि तिला सांगितलं. मला तू आवडतेस. गर्लफ्रेंड म्हणून जास्त आवडशील. तिनं मला मागूनच हलकेच मिठी मारली आणि म्हणाली, नको. आपण मित्रच राहूया. मला खूप वाईट वाटलं. तिचं कुटुंब गडगंज श्रीमंत होतं. मोठा बंगला, नोकरचाकर, चारचाकींचा ताफा. आपण मिड्ल क्लास. साहजिकच होतं. मी तिला तिच्या पीजीवर सोडलं आणि घरी निघालो. पण घरी जाता जाता मी काही प्रेमात अयशस्वी झालेल्या नायकासारखी गाणी वगैरे म्हटली नाहीत. मी विचार करत होतो, की आपल्याला वाईट तर वाटतंय, पण अजून काहीतरी वाटतंय. ते असं की मला वाईट वाटलं होतं त्यापेक्षा जास्त जोरात छान वाटत होतं. कारणही तसंच होतं. ती माझ्या घरात, माझ्या इतक्या जवळ उभी असूनही, आम्ही एकटे असूनही मी तिची पापी घेतली नव्हती. तिच्या मनात असलं काही नव्हतं, फक्त माझ्या मनात होतं. आणि ते करणं चुकीचं आहे हे मला समजलं होतं. मी सुटकेचा निश्वास सोडला. आपल्या आईनं तेव्हा आपल्याला भारी शिकवण दिली, हे मला आता जाणवतं.

तर मग कॉलेज संपलं आणि काळाच्या ओघात आमचा संपर्क तुटला. अधूनमधून एखादी ईमेल किंवा मेसेज इतकंच. तेसुद्धा दोनतीन महिन्यांमधून एकदा. पण एकदा तिचा बरेच महिने संपर्क झाला नाही. फोन केला, मेसेजेस केले, उत्तर नाही. मग आमचा एक कॉमन मित्र आहे, त्याला मी भेटलो तेव्हा विचारलं. तर म्हणाला, अरे, तिचा मोठा प्रॉब्लेम झाला. मी म्हटलं काय झालं? तर म्हणाला, की तिच्या जवळच्या नात्यातल्या एका मुलीच्या बॉयफ्रेंडनं तिला खूप मारलं. चेहरा सुजेपर्यंत मारलं. माझं टाळकंच सटकलं. मी कोल्हापूरचा असल्यानं ते होतंच. ठरलेली प्रतिक्रिया - मी त्याला म्हटलं, आत्ता जाऊया आणि त्याला बदाबद मारुया. पण मित्र पुण्याचा. असलं काय नको म्हणाला. शिवाय या गोष्टीला सहाएक महिने होऊन गेले होते. घरी समजलं होतं. पण तिच्या आईनं तुझीच काहीतरी चूक असेल, तूच काहीतरी केलं असशील असा उलटा दोष तिला दिला. याहून भयानक प्रकार म्हणजे तिच्या नात्यातल्या मुलीनं त्याच मुलाबरोबर लग्न केलं आणि तिच्या घरीही येऊन तो मुजोरपणे राहिला. घरच्यांनी हा विषय चक्क मागं टाकला.

पुढं मग तिचं लग्न झालं, ती आयुष्यात सेटल झाली. बऱ्याच वर्षांनी तिचा मेसेज आला, तू जागा आहेस का? तुझ्याशी बोलायचंय. मी म्हणालो हो बोल की. तेव्हा तिनं मला हे सांगितलं. मी म्हटलं तेव्हाच सांगितलं असतंस तर आपण त्याबाबतीत काही केलं असतं. पण ती म्हणाली, घरच्यांनी काही करू दिलं नसतं. प्रतिष्ठा वगैरे. अर्थात या गोष्टीला आता बारा-पंधरा वर्षं वगैरे उलटून गेली होती. पण मग ती म्हणाली, तिनं मेसेज वेगळ्याच कारणासाठी केला होता. त्याचं झालं असं, की ती काही कारणासाठी तिच्या या नात्यातल्या मुलीच्या घरी रहायला गेली होती तेव्हा याच माणसानं, इतक्या वर्षांनी पुन्हा तिच्याशी जवळिक करायचा प्रयत्न केला. तिनं नकार दिल्यावर त्यानं तिला पुन्हा मारलं आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. परकं शहर. अंगातली हाडं मोडलेली, चेहरा सुजलेला. अशा अवस्थेत तिनं एक आठवडा काढला. नंतर घरी सांगितलं तर आई पुन्हा तेच म्हणाली, तुझीच चूक आहे. तू त्याच्या खोलीत गेलीसच का? तूच काहीतरी केलं असशील, त्याला चिथवलं असशील. पण तिच्या नवऱ्यानं, वडिलांनी समजून घेतलं, तिला यातून उभं रहायला लागेल ती सगळी मदत केली. आज ती पुन्हा पूर्वी होती तशीच दिसते. वरकरणी हसरी, आनंदी. गोड. पण या घटनेनं तिला आतून पूर्णपणे बदलून टाकलंय. तिचा माणसांवरचा विश्वास गेलाय. ती आता माझ्याशीही बोलत नाही.

ही काही मोजकी उदाहरणं. पण असेच अनुभव बहुदा सगळ्याच स्त्रियांना येतात. त्यांची आयुष्यं मोठ्या प्रमाणात बदलून जातात. तुमचं अख्खं आयुष्य तुम्हाला अशा घटनांचं ओझं वागवत घालवायला लागतं. आता कितीही म्हटलं की झालं ते झालं… तरी झालेलं नाकारता येत नाही. बदलता येत नाही. त्याचा त्रास होणं बंद झालं तरी त्याचं अस्तित्व आठवणींच्या रुपात रहातंच.

पुरुष असं का करतात? इथं काय किंवा युरोप-अमेरिकेत काय, पुरुषांना महिलांवर आपला अधिकार आहे असं वाटतं. त्यात त्यांना गैर काहीच वाटत नाही. अगदी आजीपासून लहान मुलीला घरातली कामं सांगणं - चहा कर, जेवायला वाढ, तेल लावून दे वैगरे. मैत्रिणींचा हात पकडणं, त्यांच्या शरीराला हात लावणं, त्यांचे मोबाईल काढून घेणं, रस्त्यातल्या मुलींची छेड काढणं, चुंबन देणं, विनयभंग करणं, मारहाण, बलात्कार करणं… पुरुषांना यात गैर काहीच वाटत नाही. उलट अनेक पुरुष म्हणतात, स्त्रियाही म्हणतात, नुसता हात लावला म्हणून काय झालं? पप्पी घेतली म्हणून काय झालं? मुलींनाही तेच हवं असतं. 

पण हे बदलायचं कसं? बरेच लोक म्हणतात, बलात्कारासाठी फाशीची तजवीज करा, कॅस्ट्रेशन करा, चौकाचौकात कॅमेरे लावा, रात्री मुलींचं फिरणं बंद करा वगैरे. त्याशिवाय हे बदलणार नाही वगैरे. पण मला अनुभवातून असं वाटतं, की हे केवळ शिक्षणातूनच बदलता येऊ शकतं.

मी शिवाजी विद्यापीठात एक वर्ष मास कम्युनिकेशनला तात्पुरता शिक्षक म्हणून शिकवलं. तेव्हा दिल्लीमध्ये १६ डिसेंबरचं निर्भयाचं जे भयानक प्रकरण घडलं होतं, त्याबद्दल विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये काहीतरी उलटीपालटी चर्चा सुरू होती. मला काही त्या चर्चेचा रोख आवडला नाही. आणि एक शिक्षक म्हणून मला त्या चर्चेमध्ये हस्तक्षेप करावासा वाटला. पण मी काही बोललो नाही. त्यादिवशी मी लेक्चर्स न घेता त्यांना “थेल्मा अँड लुईझ” नावाची एक फिल्म दाखवली. यामध्ये दोन प्रौढ मैत्रिणी आपल्या गाडीतून फिरायला जातात आणि रस्त्यात एक माणूस त्यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न करतो त्याला त्या ठार मारतात आणि मग पोलिस त्यांच्यामागं लागतात अशी ती गोष्ट. शेवटी दोघींसमोर कड्यावरून गाडी चालवत दरीत उडी मारणं हा एकच पर्याय उरतो. अतिशय हादरवून टाकणारी फिल्म.

तर फिल्मच्या निमित्तानं मग चर्चा सुरू झाली. काही मुलं फिल्म बघतानाही अस्वस्थ होती. मी विचारलं, काय झालं, तर म्हणाली, फिल्ममधला बलात्काराचा प्रसंग बघून बेकार वाटलं. मुलं बोलती होत होती. पण सगळ्यांचंच म्हणणं होतं, मुलींचंही - की चूक थेल्माचीच होती. तिनं त्या माणसाबरोबर नाचायला नाही पायजे होतं.

इथून सुरुवात होती सगळी. मग आमची खूप चर्चा झाली. साधारण तीनेक तास. तास संपवून आम्ही नंतर कँटीनमध्ये ही चर्चा पूर्ण केली. शेवटी मुलंच म्हणायला लागली, नाही सर, चूक त्या माणसाचीच होती. एक शिक्षक आणि एक माणूस म्हणून मला खूप बरं वाटलं. झालं, हा विषय तिथंच संपला. मग काही महिन्यांनी एक विद्यार्थिनी मला भेटायला माझ्या कक्षात आली. मला वाटलं काही शंका असेल, शिकवलेलं समजलं नसेल म्हणून आलीय. तर म्हणाली, मला तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. मी चक्रावलो. कशासाठी? मी विचारलं. तर म्हणाली, आपली त्यादिवशी जी चर्चा झाली होती त्यामुळं आमच्या वर्गातले आमचे सगळे मित्र खूप बदललेत. आधी मुलींची छेड काढणं, त्यांना टोमणे मारणं त्यांच्यासाठी नॉर्मल होतं. पण ते आता तसं करत नाहीत. उलट जे करतात, त्यांना सांगतात तसं करू नका. आपल्या चर्चेमुळं हे झालं म्हणून तुम्हाला थँक्यू.

तेव्हा माझ्या लक्षात आलं. हे बदलू शकतं. त्यासाठी गरजेचं आहे शिक्षण. ते घरी, शाळांमध्ये आणि कॉलेजात मिळायला पाहिजे पण दुर्दैवानं मिळत नाही. आपणच त्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी बनणं गरजेचं आहे. कुठं चुकीचा विचार कोणी मांडताना दिसला तर त्याची चूक दुरुस्त करण्याचं धाडस आपण दाखवलं पाहिजे. कोणी धर्माचे, संस्कृतीचे दाखले देऊन स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचं समर्थन केलं तर आपण आधुनिकतेचे, माणुसकीचे दाखले देऊन त्या विचाराचं खंडन केलं पाहिजे. आपल्या घरातल्या मुलांनी याबद्दल विचार करावा यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. बलात्कार, मारहाण, लैंगिक छळ यासाठी मुलीला दोष देण्यापेक्षा या पुरुषी अहंकाराला संपवलं पाहिजे. तुमची मुलगी, बहीण, मैत्रीण, आई - कोणीही तुम्हाला काही सांगत असेल, तर तिचं ऐकून घेतलं पाहिजे.

आज जागतिक महिला दिन आहे. मानवी इतिहासात बायकांनी जे सोसलंय त्याच्या विरोधात त्यांनी उठवलेल्या आवाजाची ती एक आठवण आहे. पण महिला दिन आला, की व्हॉट्सॅप, सोशल मीडियावर पुरुष दिन का नाही, किंवा रोजच महिला दिन असतो वगैरे फालतू गोष्टी सुरू होतात. आपल्या समाजानं - यात महिला आणि पुरुष दोन्ही आले - असा समज करून घेतलाय की महिला दिन ही एखादी पुरुषविरोधी गोष्ट आहे, किंवा यादिवशी महिला मस्ती आल्यासारख्या वागतात वगैरे. त्यापेक्षा पुरुष दिन काढा. पुरुषांबद्दल कोणी काही बोलत नाही, लिहित नाही वगैरे रड सुरू होते. असं बोलायला लागलं, की मला माझ्या आयुष्यात अगदी जवळून बघितलेल्या या बायकांची प्रकर्षानं आठवण होते, हृदयात खड्डे पडतात.

आता विषय लिंगूच्या लेकीचा. त्याला तिचं नाव ठेवायचंय दिमित्रा – म्हणजे गॉडेस ऑफ ॲग्रिकल्चर. शेतीची देवी. विनयाला नाव ठेवायचंय मुक्ता. या देवीसाठी, मुक्तेसाठी एक सुंदर जग निर्माण व्हावं म्हणून मला आज हे लिहावंसं वाटलं.


- नीरज नारकर

Post a Comment

Previous Post Next Post