Nature

यवतमाळात ‘ग्लॅमर’ मिळवून ‘सेलिब्रिटी’ झालेली भक्ती

यवतमाळची चमक: महिला दिन विशेष भक्ती दुधेचा प्रवास.....

     "सप्नांना आकार देणारी भक्ती: यवतमाळच्या                 इन्फ्ल्युएंसर्सची कहाणी"



       वडील शेतकरी, आई गृहिणी आणि दोन बहिणी. मोठ्या बहिणीचे लग्न झाले, लहानीने अभियांत्रिकेचे शिक्षण घेतले. ती अजुनही शिकते आहे. ‘Earn and Learn’ उक्तीप्रमाणे शिकता शिकताच कमावतीसुद्धा झाली आहे. कॉलेजमध्ये शिकत असताना तिच्या हाती मोबाईल आला आणि तिला फोटो काढण्याचे जणू व्यसनच लागले. ती सोशल मीडियाच्या या अथांग मायाजालात अडकरणार तर नाही, अशी भीती तिच्या निकटवर्तीयांना वाटत असे. मात्र तिची फोटो काढण्याची सवय आणि हाच सोशल मीडिया आता तिचा ‘इन्कम सोर्स’ झाला आहे. एरवी मॉडेलिंग म्हटले तर त्यासाठी मुंबई किंवा अन्य मोठ्या महानगरातच जावे लागणार, असे कोणीही म्हणेल. यवतमाळात मॉडेलिंग, जाहिरातीत किरिअर शक्यच नाही, असेच कोणीही ठामपणे सांगेल. मात्र यवतमाळसारख्या लहान शहरातही मॉडेलिंग, जाहिरात आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर म्हणून ‘ग्लॅमर’ मिळवून ‘सेलिब्रिटी’ होता येते, हे भक्तीने आपल्या कामातून दाखवून दिले आहे.

     पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात भटकंती करत घर, गाव, शहर सोडणारे असंख्य तरूण, तरूणी आपल्या आसपास असतात. पाच, दहा हजार रूपयांची नोकरी करण्यासाठी पाच, सहाशे किमी दूर जाणारे असंख्य मुलं आपण बघतो. आपल्या अंगभूत कौशल्यांचा शोध घेवून आपल्या गावातच रोजगार शोधण्याचे धाडस कोणी करत नाही. मात्र भक्ती शशांक दुधे ही अभियांत्रिकी पदवीधर तरूणी सध्या सोशल मीडियावर इन्फ्ल्युएंसर म्हणून असंख्य तरूणींची रोल मॉडेल ठरली आहे. यवतमाळसारख्या लहान शहरात ग्लॅमरस मॉडेल म्हणून भक्ती मोठे नाव कमवत आहे. उद्या शनिवारी साजऱ्या होत असलेल्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भक्तीसोबत साधलेला हा संवाद. 

  


         अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर भक्तीने सोशल मीडियाचा करिअर म्हणून विचार केला. सध्या जाहिरातीचा ट्रेंड बदलला असल्याने सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे रिल, जाहिराती करण्याचे फॅड आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, यु-ट्युब आदी सोशल प्लॅटफॉर्मवर अनेक तरूण, तरूणी सध्या इन्फ्ल्युएंसर म्हणून नावलौकीकास आले आहेत. यवतमाळात अशा प्रभावकांमध्ये भक्ती दुधे हिचे नाव अग्रक्रमावर आहे. विशेष म्हणजे भक्ती ही यवतमाळातील पहिली महिला इन्फ्ल्युएंसर आहे. आजच्या घडीला ती शहरातील प्रत्येक छोट्या, मोठ्या प्रतिष्ठानांची सोशल मीडियातून जाहिरात करते आहे. अभियांत्रिकी पदवीनंतर अंगभूत कौशल्यांचा वापर करून मॉडेलिंग, जाहिरातीचे क्षेत्र निवडून ती आत्मनिर्भर झाली आहे. 

    


        भक्तीचे दहावीपर्यंतचे शिक्षण येथील नंदूरकर विद्यालयात झाले. शासकीय तंत्रनिकेतनमधून टेक्सटाईल विषयात डिप्लोमा केला. यवतमाळातच टेक्सटाईलमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले व आता एमबीएचे शिक्षण घेत आहे. याच दरम्यान हातात आलेल्या मोबाईलने तिला फोटो काढण्याचे जणू व्यसनच लागले. त्यामुळे आई-वडिलांसह नातेवाईकही तिला नेहमी फोटोच काढते, तुझे कसे होईल म्हणून ओरडत असायचे. त्यावेळी नंदूरकर शाळेतील शिक्षक जयंत चावरे यांनी फोटोंचा हा छंद व्यवसायात बदलण्याची दिशा दिल्याचे भक्ती सांगते. त्यातून स्वत:तील मॉडेल शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला कॉलेजमध्ये फॅशन शो झाला, त्यात भाग घेतला आणि तेथून मॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला. मॉडेलिंग म्हटले की, मुंबईशिवाय पर्याय नाही. मात्र आपण यवतमाळात आई-बाबांसोबत राहुनच या क्षेत्रात ‘सेलिब्रिटी’ बनण्याचे ठरविले, असे भक्ती म्हणाली. विविध सण, उत्सवानिमित्त केलेले फोटोशुट अनेक वर्तमानपत्रांत छापून आले. याच दरम्यान काही प्रतिष्ठानांकरीता व्हिडीओ शुट केले. त्याला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळाला. यातून मग यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून जाहिरातीकरीता बोलावणे येवू लागले. सध्या दिवसातून एक, दोन जाहिरातींचे शुटिंग करते. त्यासाठी स्वत:च कंटेंट लिहिते. कोणाकडे नोकरी न करता स्वत:च्या कौशल्यावर पैसा कमवता येत असल्याचा वेगळाच आनंद असल्याचे भक्तीने सांगितले. सोशल मीडियावर भक्तीचे २० हजारांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. 

  


     २०२४ मध्ये भक्तीला ‘मिस यवतमाळ’ हा पुरस्कार मिळाला. नागपूर येथे झालेल्या एका सौंदर्य स्पर्धेतही तिने पुरस्कार मिळविला. ‘मिस महाराष्ट्र’साठीही तिची निवड झाली होती. मात्र परीक्षेमुळे ती सहभागी झाली नाही. पदवी घेतल्यानंतर तिने सहा महिने एका टेक्सटाईल कंपनीत नोकरीही केली. मात्र टेक्सटाईल या विषयात पदवीधर असल्याने याच क्षेत्रात उद्योग सुरू करण्याचे स्वप्न घेवून नोकरीतून बाहेर पडली. त्यांनतर मॉडेलिंग, जाहिरात आणि सोशल इन्फ्ल्युएंसर म्हणून कामावर लक्ष केंद्रित केल्याचे तिने सांगितले. भक्तीचे वडील शेतकरी असून, दारव्हा तालुक्यातील लाडखेड येथे शेती करतात, तर आई गृहिणी आहे. मोठ्या बहिणीचा विवाह झाला असल्याने आपल्याला आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी त्यांच्यासोबतच राहायचे असल्याचे भक्तीने सांगितले. त्यामुळे भविष्यात यवतमाळात टेक्सटाईल क्षेत्रात व्यवसाय करण्याचे तिचे स्वप्न आहे. भक्तीला अनेक कार्यक्रमांमध्ये आमंत्रित केले जाते. जागतिक महिला दिनानिमित्त भक्तीचे अनेक ठिकाणी कार्यक्रम होत आहे. महिलांनी, तरूणींनी आपल्या आवडीच्या क्षेत्रातच करिअर करावे. आवडीच्या क्षेत्रात काम केल्याने प्रगतीच्या संधी अधिक असतात, असे भक्ती म्हणाली. भक्तीच्या स्टेटसवर एक वाक्य आहे, ‘तुमची ओळख सांगून लोकांनी आपली कामं करून घेण्याचा प्रयत्न करावा, एवढं तरी यश आयुष्यात मिळायला हवं..!’ या वाक्यातच भक्तीच्या यशाचे रहस्य दडले आहे. ठरविल्याप्रमाणे ती या यशापर्यंत पोहोचली आहे, पण तिला अजुन फार मोठा पल्ला गाठायचा आहे, त्यासाठी शुभेच्छा. 

नितीन पखाले

Post a Comment

Previous Post Next Post