जिव्हाळ्यानं राहणारी ही माणसं. आज इतकी पेटली कशी? पेटली, की पेटवली? हिंदूंचे सण असो की, मुसलमानांचे, सगळेच तर मिळून मिसळून साजरे करणारा आमचा हा महाराष्ट्र इतका कसा बदलतो आहे? का?
नागपुरातली कालची घटना ऐकून, पाहून खूप अस्वस्थ वाटतंय. हे आमचं नागपूर नाही. हा आमचा महाराष्ट्रही नाही.
नागपुरातील महाल, इतवारी भाग म्हणजे तर अगदी ग्रामीण भागात जसे लोक भाईचाऱ्यानी राहतात, एकमेकांना धरून राहतात, तसे राहणारे. फ्लॅट संस्कृती किंवा फालतूचे मॅनर्स वगैरे तिकडे नाहीतच. घरची साखर संपली काय? चला शेजारी वाटी घेऊन. अगदी ह्यांच्या ऑफिसची वेळ झाली तर शेजारच्या चाचीकडून चार चपात्या आणायच्या आणि ह्यांच्या डब्यात भरायच्या. चाचीला नंतर देऊच. इतकी जिव्हाळ्यानं राहणारी ही माणसं. आज इतकी पेटली कशी? पेटली की पेटवली?
हिंदूंचे सण असो की, मुसलमानांचे, सगळेच तर मिळून मिसळून करणारा आमचा महाराष्ट्र. इतका कसा बदलतो आहे? का?
मला आठवतं, माझ्या लहानपणापासून गावात एक मुस्लिम कुटुंब राहत होतं . कुणात काहीच दुजाभाव नव्हता. त्यांची फरीदा माझी मैत्रीण होती. आज तर खूपच मित्रमैत्रिणी आहेत. माझा मुलगा शाळेत जायला लागला. त्याचा खास मित्र होता रफिक. माझी मोठी बहीण धामणगाव जवळच्या देवगाव फाट्याजवळच्या हिरपूरची. जवळच अगदी लहानसं एकगाव उसळगव्हाण. तिथे मौला बाबा म्हणून एक फकीर होऊन गेलेत. आमच्या बहिणीकडे म्हणजे बिरे कुटुंबाकडे त्यांची खूप भक्ती. त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आमचे नानासाहेब बिरे (माझे जिजाजी) दरवर्षी मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहात करायचे. तिथे मुस्लिम कमी आणि हिंदूच जास्त यायचे. माझी वर्धेची बहीण ठाकरे. चक्क ठाकरे! त्यांचं कुलदैवत फरिदबाबा आहेत. आता या ठाकरे नावाच्या कुणबी परिवाराचे कुलदैवत मुस्लिम फरिदबाबा कसे? हा प्रश्न तुमच्यापैकी अनेकांना पडू शकतो. आम्हाला नाही पडला. आजही ठाकरेंच्या घरून त्यांच्या पुण्यतिथीला मलिदा जातो. ईद आणि मोहरमला खिचडा जातो. माझ्या बहिणीचे सासू, सासरे काही फार पुरोगामी वगैरे नव्हते. शंभर वर्षांपूर्वीचे साधारण शेतकरी कुटुंबातले लोक जसे ऑर्थ्रोडॉक्स विचारांचे असायचे तसेच तेही होते. तरीही त्यांच्या घरात फरिदबाबाला इतके का पुजले जात होते असेल? असे अनेक कुटुंब आपल्याकडे आहेत. असतील.
माझी एक मैत्रीण आहे वंदना महात्मे. तिचे आई-बाबा दोघेही प्राध्यापक होते. आईची नोकरी दरव्ह्याला आणि बाबा आणि ही मुलं धामणगावला. त्यांच्या शेजारी जे मुस्लिम कुटुंब होतं, त्यांच्यासोबत यांचे इतके स्नेहाचे संबंध होते की त्यांचे बहीण, भावाचे संबंध असल्यामुळे ते दादा हिच्या आईला आपाजान म्हणायचे आणि ही सगळी मुलं त्यांच्या भरोशावर सोडून यांचे बाबा दिवसभर कॉलेजला जायचे. त्या बहिण, भावांच नातं इतकं प्रसिद्ध होतं की, अनेकांना वंदनाची आईसुद्धा मुस्लिमच वाटायची. इतकी वर्षे या गोष्टी कधी विशेषही वाटल्या नाहीत. आज त्या आवर्जून आठवतात.
उसळगव्हाणच्या मौला बाबाच्या कार्यक्रमाला माजी आमदार शरद तसरे, बाबासाहेब घारफळकर , माजी आमदार अरुण अडसड सारे उपस्थिती लावायचे. कुणाच्याही मनात कधी विकल्प आला नाही. आम्ही सोडा, आमची मुलं आणि आमच्या नातवंडांनाही असले फालतू प्रश्न कधी पडले नाहीत. पुढल्या पिढीला आपण काय देणार आहोत?
आपल्याला काय वाटतं , काय हवं, नको हे सांगण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. पण त्यासाठी दंगे घडवून आणणे. त्यांच्या पवित्र हिरव्या चादरवर, कुराणाच्या आयात लिहिलेल्या चादरीवर लाथा मारून अपमानित करणं हे चुकीचच आहे ना? रामाला, कृष्णाला लाथा मारलेल्या चालतील काय?
मित्रांनो, यात आज तुम्ही सहभागी झालात ते स्वेच्छेनं की कुणाच्या सांगण्यावरून मला माहिती नाही. पण तुम्हा आंदोलनकर्त्यांना भविष्यात खूप कठीण जाणार आहे. जर तुम्ही पोलिसांच्या हातात सापडलात तर तुमच्यावर कलमं लागली असतील, त्याचे किती दूरगामी परिणाम तुमच्या आयुष्यावर होतील, याचा विचार केलाय का? नोकरीमध्ये तर मोठाच प्रॉब्लेम होईल पण तुमचा पासपोर्टसुद्धा तुम्हाला मिळणार नाही. त्यावेळी नोकरी द्यायला हे राजकारणी, तो औरंग्या येणार आहेत काय? विचार करा.
अस्मिता आम्हालाही आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आमचीही दैवत आहेत. पण महाराष्ट्राची शांतता आम्हाला अधिक प्यारी आहे. कारण ही शिकवण आम्हाला शिवाजी, जिजाऊंनीच दिली आहे. तेव्हा जरा सबुरीने घ्या. मित्रांनो महाराष्ट्र आपला आहे. नागपूर आपलं आहे. त्याला सांभाळणं आपलच काम आहे. शांतता राखा.
अरुणा सबाने
9970095562
.jpg)
Post a Comment