Nature

सैयारा : Emotional Detox की...



सैयारा : Emotional Detox की...


सैयारा… सोशल मीडियापासून, प्रिंट मीडियापर्यंत सर्वत्र चर्चेत असलेला चित्रपट. इन्स्टा, व्हाट्सअप, स्नॅपचॅट या माध्यमांवर सैयाराबद्दल चांगलं आणि वाईटही (टीकात्मक) भरभरून लिहलं, बोललं जात आहे. चित्रपटागृहात कपल्स रडतानाचे अनेक रिल्स पोस्ट होत आहेत. त्यामुळे ‘बायको’सोबत चित्रपट पाहण्याचा प्लॅन केला, तर घरातच असलेल्या ‘जनरेशन झी’ने बकवास मुव्ही आहे, ती बघताय तुम्ही? असे म्हणत थांबविण्याचा प्रयत्न केला. आई-बाबा तुमच्या जनरेशनच्या फिलींग्ज नाही मिळणार त्यात, असा सल्ला देत अडवणूकही झाली. पण, सैयारा बघायचा ठरवून गेलोच मल्टीप्लेक्समध्ये. तेथे तर घरच्यापेक्षाही वाईट अनुभव आला. तिकीट खिडकीवर सैयाराची तिकीट मागितल्यानंतर बाजूच्या खिडकीवर असलेल्या दोन तरूणांनी अंकल, नका बघू, आम्ही बघून पस्तावलो, असे सांगितले. तरीही तिकीट घेतलीच, तर गेट किपरने अख्खे थिएटर खाली आहे, कुठेही बसा असे सांगत, त्यापेक्षा नरसिंम्हा बघा, असा सल्ला दिला. त्यामुळे सैयाराबद्दल एक निगेटिव्ह नॅरेटिव्ह घेवूनच आत बसलो. खरंच, थिएटरमध्ये आम्ही केवळ आठ, दहाच प्रेक्षक होतो.

चित्रपट सुरू झाल्यानंतर अभिनेत्रीच्या विवाह नोंदणीचा पहिलाच प्रसंग मनाची पकड घेवून गेला. तेव्हाच स्पार्क झालं की, काहीतरी हटके स्टोरी असेल आणि पुढे अडीच, पावणेतीन तास या चित्रपटाने मनावर घट्ट पकड घेतली. अर्थातच तद्दन व्यावसायिक स्टोरी असुनही या कथानकातील भावनिक मांडणी बघणाऱ्याच्या मनातील आठवणीच्या कप्प्यातील व्यक्त, अव्यक्त प्रेम उसवत नेते. प्रेम म्हणजे केवळ एकमेकांसोबत राहणं नसून, एकमेकांपासून दूर गेल्यानंतरही त्या त्या परिस्थितीत एकमेकांसाठी जगणं असतं, हे या चित्रपटातून सातत्याने मनावर बिंबवलं जातं.

एका बाजूला, संवेदनाहीन म्हणून गृहित धरलेली जेन-झी ही पिढी हा चित्रपट पाहून थेट डोळे पुसताना दिसते. दुसऱ्या बाजूला, रडका, रटाळ, पूर्वी पाहिलेल्या कथांचा रिमेक म्हणून सैयारा नाकारण्याचा प्रयत्न होताना दिसते. Saiyaara हा चित्रपट केवळ एका नवोदित प्रेमकथेची भावनिक गुंफण नाही तर तो ‘जेन-झी’सह त्याही आधीच्या ‘जेन-वाय आणि एक्स’ या जनरेशनच्या प्रेमातील भावना, विरह, असुरक्षितता, आणि आत्मशोध यांचा आरसा ठरतो. तरीही प्रश्न उरतो की, आता जेमतेम वयाच्या वीशी, बावीशीत असलेली जेन-झी हा चित्रपट पाहून रडताना दिसते, ते कसे? खरे तर या जनरेशनच्या सामाजिक, भावनिक गरजा वेगळ्या आहेत. तरीही, सैयारामध्ये ही पिढी नेमके काय बघते? पूर्वीच्या पिढींच्या ‘अनकंडिशनल लव्ह’ किंवा प्रेमातील निष्ठेच्या विचारापलिकडे जावून जेन-झी ‘कंडिशनल, सिच्युएशनल, युज अँड थ्रो, बी प्रॅक्टिकल’ या अर्थाने प्रेमाकडे बघते, असा ठाम समज समाजात आहे. या दोन्ही बाजूंनी विचार केल्यानंतर खरंच हा चित्रपट रडका आहे? की, हा चित्रपट बघितल्यानंतर आपण कथानकाची आपल्या आयुष्यातील त्या त्या पात्राशी सांगड घालून भावविभोर होतो, असा विचार येतो.

सैयारा ही क्रिश (अहान पांडे) आणि वाणी (अनित पडडा) या दोन परस्परविरोधी स्वभावाच्या व्यक्तींची कथा. नायक क्रिश एक अस्थिर, बिनधास्त, स्वाभिमानी आणि वडिलांच्या व्यसनामुळे अस्वस्थ राहणारा, स्वतःशीच झगडणारा स्ट्रगलर गायक. टॅलेंट असूनही गरीब असल्याची बोच त्याला सतत खात असते. या परिस्थितीतून बाहेर पडून झटपट श्रीमंत होण्याचे, स्टार होण्याचे स्वप्न रंगवत त्याचा संघर्ष सुरू असतो. तर नायिका वाणी ही अत्यंत साधी, सोज्वळ मुलगी, कुटुंबात रमणारी मुलगी. पूर्वायुष्यात प्रेमात मिळालेल्या धोक्यामुळे तिचं आयुष्यचं जणू थांबलेलं. सुंदर, तरल, सहज कविता करणारी वाणी जुन्या आठवणींनी थिजून गेली आहे. जेन-झीच्या  पिढीत ही भावनिक आंदोलन करणारी मुलं, मुली आपल्या आसपास सहज आढळतील. फक्त त्या नजरेने त्यांना शोधावे लागेल. चित्रपट बघताना ही पिढी भावोत्कट का होते, याचे उत्तर या आपल्या आसपास असलेल्या पात्रांमध्ये दडले आहे. रिल आणि रियल लाईफमध्ये खूप फरक असला तरी, या दोन्ही गोष्टी एकमेकांना पुरक आहेत. रिल लाईफमध्ये दिसतं ते अनेकदा आपल्या आयुष्यात घडत असतं, आणि रियल लाईफमध्ये सहज घडणाऱ्या गोष्टी कथेचा भाग बनून पडद्यावर जातात. आपल्या मनातील भाव जेव्हा पडद्यावर कोणीतरी अनुभवत आहे, हे दिसतं तेव्हा भावोत्कट होणं स्वाभाविक आहे.

प्रतिभावंत आणि सृजनशील व्यक्तींमधील हे द्वंद्व आणखी वेगळ्या पातळीवरचे असते. कुठलाही कलावंत हा कलेच्या अंगाने आयुष्याकडे बघतो. पण, जेव्हा त्याच्या आजुबाजूला सर्व निरस आणि निराशाजनक वातावरण असेल, त्याच्या कलेची कदर होत नसेल, त्याला प्रोत्साहन मिळत नसेल, त्याच्या भावना समजून घेतल्या जात नसतील तर त्याच्यातील कलावंत मरण्याची भीती असते. सैयारामधील वाणी आणि क्रिश हे दोघे वेगवेगळ्या परिस्थितीशी झगडत असताना ते भेटतात तेव्हा त्यांचा पहिला परिचय हा कलावंत (कवियित्री-गायक) म्हणून होतो. कोणालातरी आपल्या कविता आवडल्या, ही भावना वाणीला लिखाणासाठी उभारी देणारी असते, तर आपण गाणं गावं म्हणून कोणीतरी कुठल्याही अपेक्षेशिवाय गाणी लिहून देतो, ही भावना क्रिशला प्रोत्साहित करणारी असते. आपल्या रियल लाईफमध्ये यापेक्षा वेगळं काय होतं? ज्यांना आपण आपलं मानतो किंवा आपलं कुटुंब आपल्याला अनेकदा नाउमेद करते. आपल्या कलेची खिल्ली उडवते, असं एकूण समाजात चित्र आहे. अशा टप्प्यावर आयुष्यात येणारा तो किंवा ती आपल्यातील कलावंतास प्रोत्साहन देते आणि कलावंत म्हणून आपण आपले सर्व एफर्ट्स लावतो. हे सर्व अनेकांच्या दैनंदिन आयुष्यात सहज घडतं. म्हणूनच सैयारा हा आपल्या भावनांशी, मनात साचलेल्या आठवणींशी आणि कधी काळी पाहिलेल्या स्वप्नांशी जोडला जातो आणि आपण त्यात स्वत:ला शोधत कथानकात गुंतत जातो.  
या पलिकडे नायक-नायिकेतील उत्कट प्रेम, विरह, आजारपण हा सर्व नेहमीचाच ड्रामा आहे. त्यात नवीन काही नाही. त्यामुळे तो कधी या चित्रपटाचा दिग्दर्शक मोहित सुरीच्याच ‘एक विलन’ किंवा ‘आशिकी-२’ या चित्रपटांचा रिमेक किंवा स्टोरी शेड्स घेवून आपण बघत आहोत असे वाटते. अनेकांना हा चित्रपट कोरिअन चित्रपटाचाही रिमेक वाटला. कथानकाची अशी मांडणी हे कोरिअन चित्रपटांचे वैशिष्ट्य आहे. ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ किंवा ‘युवर नेम’ या जागतिक कथांचा सैयारावर प्रभाव दिसत असल्याचे अनेक समीक्षकांनी म्हटले आहे. अगदी टिपीकल भारतीय कथानकाचा विचार केला तर, शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या ‘विवाह’ या चित्रपटातील भाविनिक आंदोलनाशीही सैयारा मिळता जुळता वाटतो.

सैयारातील क्रिश-वाणीचं प्रेम केवळ टाईमपास नसून, त्यात अपरिहार्य विरह, स्वतःच्या अस्तित्वाचा शोध तसेच प्रेमाची ऊब आणि धग दोन्ही आहे. आजच्या पिढीलाही निर्वाज्य प्रेम कळतं, तसं प्रेम ते करतातही, पण ते करताना ही जेन-झी अधिक अधिर, असुरक्षित असते, हेही यात अधोरेखित होतं. खरे तर वाणी ही या चित्रपटाचा गाभा आहे. तिचं संवेदनशील पण प्रगल्भ पात्र प्रेमात उतावीळ होवून चालत नाही, प्रेम करिअरच्या आड येत असेल तर अशा प्रेमापासून दूर गेलं पाहिजे, हा प्रक्टिकल विचार कृतीतून मांडते. प्रेमात आपल्या जोडीदाराला गुण-दोषांसकट स्वीकारायला हवे, त्याची चिकित्सा करू नये, हे भाव वाणीने सहजपणे मांडले आहे. प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाही हेच वाटत असतं. वाणी स्वत: दु:खी आणि असाध्य आजाराशी सामना करत असतानाही क्रिशला समजून घेते, त्याच्या अपूर्णतेला स्वीकारते, पण स्वतःच्या मूल्यांपासून मागे हटत नाही. ती संयम राखते आणि सृजनशीलतेला जगायला देते. प्रेम मुक्ती देणारं असावं, बंधन घालणारं नसावं हा भाव चित्रपटाचा आत्मा आहे.

थोडक्यात काय तर, ‘Emotional connection is not weakness. It’s self-awareness.’ एवढा बोध सर्वच पिढ्यांना Saiyaara मधून नक्कीच घेता येईल! दुसरे म्हणजे जेन-झी किंवा त्याच्या आधीची कोणतीही पिढी सैयारा बघून रडत असेल तर कदाचित हेच त्याचं Emotional Detox आहे. कधी कधी, काही चित्रपट उत्तर देत नाहीत, पण प्रश्न विचारायची संधी जरूर देतात. म्हणून भावोत्कट कथानकासाठी Saiyaara बघायला हरकत नाही, पण, रडायचे की नाही हे चित्रपट बघून ठरवा!

- नितीन पखाले
९४०३४०२४०१

Post a Comment

Previous Post Next Post