Nature

अंबाबाईच्या दर्शनाला जाताय, मग हे वाचा…

गाभाऱ्यातून दर्शनाची सोय

द इंक न्यूज

कोल्हापूर : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी प्रमुख पीठ असलेल्या कोल्हापूर येथील करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदवार्ता आहे. अनेक वर्षांनंतर आई अंबाबाईचे दर्शन आज बुधवारपासून गाभाऱ्यात जाऊन घेण्यास पुन्हा सुरूवात झाली आहे. नारळी पोर्णिमेच्या औचित्याने मिळालेल्या या भेटीमुळे भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दोन दिवसांपूर्वीच करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन गर्दीचे दिवस वगळता पुन्हा पितळी उंबऱ्याच्या आतून घेता येईल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर आज बुधवार पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोरोनाच्या काळात येथे येणाऱ्या भाविकांना गाभाऱ्यातून दर्शन बंद करून पितळी उंबऱ्यापासून दर्शन दिले जात होते. कोरोनाची साथ गेल्यानंतर हा निर्णय कायम होता. मात्र या दर्शनामुळे भाविकांना आई अंबाबाईचे मनापासून दर्शन घेतल्याचे समाधान मिळत नव्हते. त्यामुळे पितळी उंबऱ्याच्या आतून दर्शन मिळावे, अशी भाविकांची मागणी होती. आज सर्वत्र रक्षाबंधन साजरे होत असताना, आणि मंदिरात भाविकांनी अंबाबाईच्या दर्शनसाठी गर्दी केली होती. याच दरम्यान गाभाऱ्यातून दर्शनाला प्रारंभ झाल्याने अंबाबाई पावल्याची भावना भक्तांनी व्यक्त केली. 

Post a Comment

Previous Post Next Post