एमपीएससीचा (MPSC Result) हा निकाल जाहीर, उमेदवारांमध्ये चैतन्याची लाट
द इंक न्यूज
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra public service Commission) घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे निकाल लांबणीवर पडण्याचे सत्र सुरूच आहे. उमेदवारांकडून सातत्याने या परीक्षांचे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी होत आहे. आता मात्र उमेदवारांमध्ये नाराजी वाढू लागली असून पुढील तीन-चार दिवसांत निकाल जाहीर न केल्यास पुण्यात मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा स्टूडंट्स राईट्स असोसिएशनने (SRA) आयोगाला दिला आहे. त्यानंतर एमपीएससीने (MPSC) अखेर निकाल जाहीर केला आहे.
सहायक कक्ष अधिकारी संवर्गासाठी होती परीक्षा
स्टुडंट राईट्स असोसिएशनने (SRA) दिलेल्या आंदोलनाच्या इशारानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले. ३० एप्रिल २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ करीता सहायक कक्ष अधिकारी संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल ४ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे.
या वेबसाईटवर पाहता येणार निकल
प्रस्तुत पदाकरीता पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आयोगाने या दिल्या सूचना
उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या तसेच परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल. आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल असे कळवले आहे.

Post a Comment