Nature

सीबीआयने का घेतली शिक्षिकेच्या घराची झाडाझडती?

द इंक न्यूज

नागपूर : सीबीआय सारख्या महत्वाच्या यंत्रणेकडून एका शिक्षिकेच्या घराची झडती घेण्यात आल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. अत्यंत गुप्तपणे ही प्रक्रिया पार पडली,त्यामागील कारण मात्र अस्पष्ट असल्याने यावरील पडदा केव्हा उठेल,याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.



अशी आहे कहाणी

नरेंद्रनगरातील एका भाड्याच्या सदनिकेत राहणाऱ्या शिक्षिकेच्या घरावर दिल्ली सीबीआयने छापा घातला. ही कारवाई मध्यरात्री १२ वाजतापासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु होती. या कारवाईत नागपूर सीबीआयच्या अधिकाऱ्यांचाही सहभाग होता. ही कारवाई खूपच गुप्तपणे करण्यात आली, हे विशेष.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी काश्मीरमधून एक महिला नागपुरात राहायला आली होती. तिचा पती सध्या काश्मीरमध्ये राहतो. तिने नरेंद्रनगरातील एक मोठी सदनिका भाड्याने घेतली होती. तिचा पती दर महिन्याला तिला भेटायला येतो. ती महिला वर्धा रोडवरील एका नामांकित शाळेत शिक्षिका आहे. शिक्षिकेच्या घरावर छापा घालण्यासाठी सीबीआयने विशेष ऑपरेशन राबविले. त्यामध्ये नागपूर सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी मदतीसाठी घेतले. सीबीआयचे अधिकारी थेट दिल्लीहून कारने छापा घालण्यासाठी आले होते. शिक्षिकेच्या घरात जवळपास ५ तास कारवाई करण्यात आली. काही महत्वाचे दस्तावेज आणि मोबाईल, लॅपटॉप सीबीआयने जप्त केला. या छाप्याविषयी नागपूर सीबीआयचे अधिकारीसुद्धा बोलायला तयार नाहीत. गुप्त अभियानाअंतर्गत छापा घालण्यात आल्याची माहिती सीबीआयने दिली. मात्र, कारवाई कशासंदर्भात करण्यात आली, याबाबत सीबीआयने मौन बाळगले. 


देशविघातक कृत्यात तिचा सहभाग असावा?

शिक्षिका आणि तिचा पती मूळचे जम्मू-काश्मीरमधील आहेत. त्यांनी काश्मीर सोडले आणि थेट नागपूर गाठले. नागपूर शहराची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता शिक्षिकेवर संशय निर्माण झाला आहे. देशविघातक कृत्याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post