नागपुरात असाही सायबर क्राईम (work from home cyber crime)
नागपुरात एका तरुणीला वर्क फ्रॉम होम (work from home) करणे चांगलेच महागात पडले. स्वतः च्या लग्नासाठी जुळविलेली मोठी रक्कम तिला गमवावी लागली. सायबर क्राईमची (cyber crime) ही स्टोरी आपल्याला पुढे दक्ष राहण्यास मदत करणारी आहे.
द इंक न्यूज
नागपूर : बतुल अली ही अभियंता असून आई व भावासह राहते. अलिकडेच तिचे लग्न जुळले. लग्नासाठी आईने पैशांची जुळवा- जुळवही केली होती. दरम्यान ७ ऑगस्ट रोजी सायबर गुन्हेगाराने बतुलच्या मोबाईलवर फोन केला आणि पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवले. घरबसल्या काम असल्याने बतुलनेही होकार दिला. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण केल्यास चांगली रक्कम मिळेल, असे आमिष आरोपीने सुरुवातीला दिले.
पीडित तरुणीचे संपूर्ण कुटुंब आर्थिक अडचणीत
स्वत:च्या लग्नासाठी जुळवलेली १२ लाखांची रक्कम तरुणीच्या एका चुकीमुळे सायबर गुन्हेगाराच्या (cyber criminal) घशात गेली. घरबसल्या काम करून नफा कमावण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगाराने एका उच्चशिक्षित तरुणीला १२ लाखांनी फसवले. ही घटना तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत उघडकीस आली. या घटनेमुळे पीडित तरुणीचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
असा टाकला गळ
सुरुवातीला बतुलला नफाही मिळाला. त्यामुळे तिचा विश्वास बसला. त्यानंतर आरोपीने जास्त नफा कमवायचा असेल तर अधिक रक्कम गुंतविण्यास सांगितले. तसेच त्याने बतुलकडून तिचा आधार क्रमांक आणि बँक खात्याची संपूर्ण माहिती घेतली. सुरुवातीला मिळालेल्या नफ्यामुळे बतुलचा आरोपीवर विश्वास बसला होता. याचा गैरफायदा घेऊन आरोपी ऑनलाईन परतावा दाखवून अधिकाधिक रक्कम गुंतवायला लावत होता. रक्कम काढण्यासाठीसुद्धा तो पुन्हा रक्कम गुंतविण्यास सांगायचा, अशा पद्धतीने बतुलने तब्बल १२ लाख रुपये गुंतविले. मात्र मूळ रक्कम किंवा नफ्यापैकी काहीही मिळाले नाही.त्यामुळे बतुलची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

Post a Comment