द इंक
दिल्ली : सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले असून १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन होईल,अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवरून दिली आहे.यापूर्वी संसदेचे पावसाळी अधिवेशन ११ ऑगस्टला संपले.यामध्ये मणिपूर हिंसाचार, महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी पावसाळी अधिवेशन गाजवले. त्यानंतर विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. दरम्यान, संसदेचे विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत बोलावले आहे.
कालावधी बदलावा ही खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी
या विशेष अधिवेशनात अमृत काल दरम्यान संसदेत महत्त्वाची चर्चा होण्याची अपेक्षा असल्याचे जोशींनी संगितेल. दरम्यान, या अधिवेशनात कोणत्या मुद्द्यावरून चर्चा होणार याबाबत मात्र माहिती देण्यात आलेली नाही.
तसंच, १८ ते २२ सप्टेंबर काळात महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम असणार आहे. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी बदलावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
दिल्लीत शिखर परिषद
९ आणि १० सप्टेंबर रोजी दिल्लीत जी २० शिखर परिषद होणार आहे. या परिषदेनंतरच या विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. पण, अधिवेशनाचा अजेंडा अद्याप उघड करण्यात आलेला नाही.
दरम्यान, २० जुलै रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले होते. हे अधिवेशन ११ ऑगस्टला संपले. या पावसाळी अधिवेशनात लोकसभेने २२ विधेयके तर राज्यसभेने २५ विधेयके मंजूर केली. दोन्ही सभागृहांनी २३ विधेयके मंजूर करून पुढची प्रक्रिया सुरू केली आहे. या अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवरून चर्चा होणार याबाबत अद्यापही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे या चर्चेकडे लक्ष लागलेले आहे.

Post a Comment