विद्यापीठ कॅम्पसमध्ये मजनूचा तमाशा
द इंक न्यूज
अमरावती : ‘तू माझ्याशी लग्न कर, नाही तर तुझी गावात बदनामी करतो’, अशी धमकी देत एकतर्फी प्रेमात आंधळा झालेल्या तरूणाने अमरावती येथल संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये चांगलाच गोंधळ घातला. विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या एका युवतीचा या मजनूने भर रस्त्यात हात पकडून छेड काढत अश्लील शिवीगाळ केल्याने कॅम्पसमध्ये गोंधळ निर्माण झाला. विक्की वानखडे (२३), रा. उदखेड, ता. मोर्शी, जि. अमरावती असे आरोपी युवकाचे नाव आहे.
पीडित युवती ही चांदूर बाजार तालुक्यातील रहिवासी आहे. या युवती आरोपीस एक वर्षांपासून ओळखते. ती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत होती. दोन महिन्यांपूर्वी तिच्या शाखेचा निकाल लागला. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या बायोमॅट्रिकसाठी सोमवारी (२८ ऑगस्ट) दुपारी १२ वाजताच्या सुमारास ती चांदूर बाजार येथून एसटीने अमरावतीत आली. त्यानंतर ती विद्यापीठात पोहचली. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीकडे पायदळ जात असताना आरोपी विक्की वानखडे हा त्या ठिकाणी आला. मला तुझ्यासोबत बोलायचे आहे, असे म्हणत त्याने बळजबरीने पीडित युवतीचा हात पकडला. ती घाबरली. तिने हात सोडविण्याचा प्रयत्न करत तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विक्कीने तिचा मोबाईल हिसकावून घेतला. माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझी गावात बदनामी करेल, अशी धमकी त्याने दिली. पीडित युवतीला शिवीगाळ केली. त्याचवेळी तेथून विद्यापीठात जात असलेल्या दोन युवकांनी तरूणीची मदत करण्यासाठी धाव घेतली तेव्हा आरोपीने युवतीचा मोबाईल परत करत धुम ठोकली. युवतीने वडिलांना फोनवर घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीविरूद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या घटनेने विद्यापीठ कॅम्पसमध्ये खळबळ उडाली आहे.
Post a Comment